एकनाथ शिंदे मदतीला धावले
शीतल पाटील नावाच्या या महिलेला किडनीच्या गंभीर विकाराने ग्रासले होते आणि किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना तातडीने मुंबईला पोहोचणे आवश्यक होते. मुंबईकडे जाणारे नियमित विमान सुटल्याचे समजल्यावर त्यांना धक्काच बसला. वेळेत मुंबईला पोहोचणे आता त्यांच्यासाठी अक्षरशः अशक्य झाले होते, कारण शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. त्यावेळी एकनाथ शिंदे भावासारखे धावून आले.
advertisement
शीतल पाटील यांना मदतीचा हात
याचवेळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चार्टर्ड विमान जळगावहून मुंबईकडे जाण्यास सज्ज होते. शीतल पाटील यांच्या या गंभीर अडचणीची माहिती काही कार्यकर्त्यांमार्फत मंत्री गिरीश महाजन यांना मिळाली. क्षणाचाही विलंब न लावता, महाजन यांनी ही बाब शिंदे यांच्या निदर्शनास आणली आणि त्यांना शीतल पाटील व त्यांच्या पतीला आपल्या विमानातून मुंबईला घेऊन जाण्याची विनंती केली.
माझे दोन अधिकारी इथंच थांबतील पण...
शिंदे यांनी कोणताही विचार न करता तात्काळ या विनंतीला होकार दिला. "वेळ पडल्यास माझे दोन अधिकारी जळगावात थांबतील, पण माझ्या लाडक्या बहिणीला मी मुंबईला सोबत घेऊन जाईन," असे सांगत त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.
प्रवासादरम्यान आपुलकीने चौकशी...
यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शीतल पाटील आणि त्यांच्या पतीला आपल्या चार्टर्ड विमानातून मुंबईला आणले. प्रवासादरम्यान शिंदे यांनी स्वतः त्या महिलेशी संवाद साधून तिच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल आपुलकीने चौकशी केली. मुंबईत पोहोचल्यावरही त्यांनी केवळ मदत केली नाही, तर शीतल पाटील यांच्यासाठी विशेष रुग्णवाहिकेची व्यवस्था करून त्यांना वेळेत रुग्णालयात दाखल केले. एकनाथ शिंदे यांच्या या संवेदनशील कृतीने शीतल पाटील यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली आणि त्यांच्यासाठी हा विलंब खऱ्या अर्थाने जीव वाचवणारा ठरला.
