पालिकेचा पंचवार्षिक कार्यकाळ संपण्यापूर्वीच १७ डिसेंबर २०२१ ला भाजपच्या ९ नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र आता यातील पाच जणांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, माजी नगरसेवक बोधराज चौधरी, माजी नगरसेविका शैलजा नारखेडे यांचे पती पुरुषोत्तम नारखेडे, माजी नगरसेविका शोभा नेमाडे यांचे पुत्र दिनेश नेमाडे व अनिकेत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 9 माजी नगरसेवकांपैकी दोन जणांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता उर्वरीत दोन जण देखील भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.
advertisement
खडसेंचे निष्ठावंत
आगामी पालिका निवडणुकीपूर्वी भुसावळमध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. या माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे शहरात पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले हे पाचही माजी नगरसेवक हे एकनाथ खडसे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. मात्र या माजी नगरसेवकांनी आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानं हा खडसेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
