आज सुलेमान पठाणच्या मृतदेहाचे नातेवाईकांच्या मागणीनुसार जळगाव शासकीय रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन सुरू आहे. हे शवविच्छेदन सुरू असताना सुलेमानच्या कुटुंबीयांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. कॅफेमधून सुलेमानचं अपहरण करून शेतात विवस्त्र करून मारहाण केली. त्याच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा आहेत. पायाची नखं उपसल्याचा आरोप देखील कुटुंबीयांनी केला.
एवढंच नव्हे तर आरोपींनी सुलेमानला मारहाण केल्यानंतर अर्धमेल्या अवस्थेत त्याला गावी आणून घरासमोर फेकलं. तसेच सुलेमानच्या आई-वडील व बहिणींनाही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत. सर्व आरोपींना मकोका न लावल्यास नातेवाईकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सुलेमान हा जामनेर शहरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीसोबत बसला असल्याची माहिती गावातील काही तरुणांना मिळाली होती. यानंतर संतप्त झालेल्या तरुणांनी कॅफेवर जाऊन सुलेमानला बाहेर काढले आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला बसस्थानकावर आणून तिथेही मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर सुलेमान आपल्या गावाकडे निघाला असता, मारहाण करणाऱ्या तरुणांनी त्याचा पाठलाग केला. त्याला घराजवळ पुन्हा गाठले आणि मारहाण केली.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेला सुलेमान घरी पोहोचल्यावर पाणी पिताच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सुलेमानच्या वडिलांनी, रहीम खान पठाण यांनी जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी जामनेर पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी करत ठिय्या मांडला. परिसरातील इतर गावांमधूनही नागरिक मोठ्या संख्येने शहरात जमले होते.