१० जुलैच्या रात्री यावल तालुक्यातील चिंचोली येथील आडगाव फाट्याजवळ ही घटना घडली होती. जिल्हा गुन्हे शाखेने तपासाअंती चोपडा तालुक्यातील पुनगाव येथील सरपंचासह अडावद आणि उमर्टी गावातील प्रत्येकी दोन अशा एकूण ५ जणांना अटक केली. जुने वाद आणि पुनगावातील राजकीय वर्चस्व वादातून हा गोळीबार झाल्याचा अंदाज आहे. अटकेतील पाचही संशयितांना न्यायालयाने ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील चिंचोली येथी आडगाव फाट्याजवळ हॉटेल रायबा आहे. १० जुलैच्या रात्री ९ वाजता दुचाकीवर दोन जण आले. त्यापैकी एक जण दुचाकीवरून खाली उतरून हॉटेल बंद करून कारने किनगावकडे जात असलेल्या हॉटेल रायबाचे मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर यांच्याजवळ आला. त्याने बाविस्कर यांच्याकडे बीअर देण्याची मागणी केली. पण हॉटेल बंद केल्याने त्यांनी बीअर देण्यास नकार दिला. याच रागातून आरोपीनं प्रमोद बाविस्कर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी छातीत, तर दुसरी उजव्या खांद्याजवळ लागली.
या प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला. जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, यांच्या नेतृत्वात दोन पथके या पथकाची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक या पथकाने गुन्ह्याचा बारकाईने तपास केला. उमर्टी येथील दोघे कुणाच्या सांगण्यावरून गोळीबार करण्यास गेले होते, हे स्पष्ट झाल्यानंतर आणि सर्व पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी पाचही जणांना अटक केली. पुनगाव येथील सरपंच किशोर मुरलीधर बाविस्कर (वय ४०, ह.मु.कोल्हे हिल्स जळगाव), दर्शन रवींद्र देशमुख (वय २५), गोपाल संतोष चव्हाण (वय २५ दोन्ही रा. अडावद), विनोद वसंतराव पावरा (वय २२) आणि सुनील सुभाष पावरा (वय २२ दोन्ही रा.उमर्टी) अशी अटक केलेल्या पाच आरोपींची नावं आहेत.
खरं तर, पुनगाव येथे प्रमोद बाविस्कर यांचे राजकीय वर्चस्व वाढत होते. तसेच पूर्वीपासून किशोर बाविस्कर आणि त्यांच्या कुटुंबीयांशी प्रमोद यांचे वाद होते. हे पूर्व वैमनस्य व राजकीय वर्चस्व वादातून हा हल्ला झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान, या प्रकरणातील मास्टरमाइंड एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची चर्चा आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.
