पीडित महिला डॉक्टरने दिलेल्या तक्रारीनुसार, डॉ. विजय घोलप वारंवार तिच्या केबिनमध्ये येऊन अश्लील टिप्पण्या करत होता. इतकेच नव्हे, तर त्याने तिला आपल्या केबिनमध्ये बोलावून शरीरसुखाची मागणी केली. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिला डॉक्टरने महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. त्यानंतरही हा छळ थांबला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने तक्रार मागे घ्यावी यासाठी तिच्यावर प्रचंड दबाव आणला जात होता. काही व्यक्तींना तिच्या घरी आणि तिच्या पतीच्या कार्यालयात पाठवून धमक्या दिल्याचा आरोपही फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय, तक्रार निवारण समितीची सदस्य असल्याचे भासवून एका महिलेनेही तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण ती महिला खोटी असल्याचे नंतर उघड झाले.
advertisement
या सर्व गंभीर आरोपांनंतर शहर पोलिसांनी डॉ. विजय घोलप विरुद्ध विनयभंगासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या गंभीर घटनेमुळे महापालिकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच, महापालिकेच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.