ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. शेख अबूजर शेख युनूस असं मृत आढळलेल्या २१ वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्याच्या मृतदेहाची जीभ कापलेली असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून, हा घातपात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या बिलाल चौक परिसरातील तांबापुरा येथील रहिवासी असलेला अबूजर दोन दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडला होता. मात्र परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण तो सापडला नाही. अखेर, मेहरुन तलावात मासेमारी करणाऱ्या एका व्यक्तीला तलावात एक मृतदेह तरंगताना दिसला. ही माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली.
अबूजरच्या अंगावर घरातून बाहेर पडतानाचे कपडे होते आणि खिशात त्याचा मोबाईलही सापडला. मात्र, मृतदेहाची अवस्था पाहून नातेवाईकांनी जीभ कापलेली असल्याचा संशय व्यक्त केला आणि हा घातपात असल्याचा आरोप केला. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.