सुलेमान रहीम खान पठाण असं हत्या झालेल्या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील रहिवासी होता. घटनेच्या दिवशी तो जामनेर शहरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीसोबत बसला होता. याची माहिती गावातील काही तरुणांना समजली. यानंतर तरुणांनी कॅफेत शिरून सुलेमानला बाहेर खेचून आणलं आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.
advertisement
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सुलेमान हा जामनेर शहरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करत असल्याची माहिती गावातील काही तरुणांना मिळाली. यानंतर संतप्त झालेल्या तरुणांनी कॅफेवर जाऊन सुलेमानला बाहेर काढले आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला बसस्थानकावर आणून तिथेही मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर सुलेमान आपल्या गावाकडे निघाला असता, मारहाण करणाऱ्या तरुणांनी त्याचा पाठलाग केला. त्याला घराजवळ पुन्हा गाठले आणि मारहाण केली.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेला सुलेमान घरी पोहोचल्यावर पाणी पिताच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सुलेमानच्या वडिलांनी, रहीम खान पठाण यांनी जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी जामनेर पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी करत ठिय्या मांडला. परिसरातील इतर गावांमधूनही नागरिक मोठ्या संख्येने शहरात जमले होते. या जमावामध्ये काही हुल्लडबाजांनी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या घटनेची माहिती दिली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.