या प्रकरणातील संशयितांनी पाकिस्तानातील व्यक्तींशी वारंवार संपर्क साधल्याचे समोर आल्याने आता गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. धरणगाव पोलिसांनी जेव्हा संशयितांचे मोबाईल जप्त करून त्यांची तपासणी केली, तेव्हा त्यांना काही आंतरराष्ट्रीय नंबर आढळून आले. तपासात असे समोर आले की, आरोपींनी पाकिस्तानातील एका व्यक्तीला व्हॉट्सॲप आणि व्हिडिओ कॉल केले होते. विशेष म्हणजे हा नंबर 'सलमान भाई' या नावाने मोबाईलमध्ये सेव्ह करण्यात आला होता.
advertisement
या 'सलमान' नावाच्या व्यक्तीशी नेमकी काय चर्चा झाली आणि तो नेमका कोण आहे, या प्रश्नाने आता सुरक्षा यंत्रणांची झोप उडवली. या प्रकरणात तेलंगाणा कनेक्शन देखील समोर आलंय. पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली असून, त्यातील एक आरोपी तेलंगणा राज्यातील आहे. या तिसऱ्या आरोपीनेच संबंधित इराणी महिलेला बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड मिळवून दिले होते.
धरणगावात बसून पाकिस्तानातील 'सलमान खान' किंवा 'सलमान भाई' नावाच्या व्यक्तींशी संवाद साधण्यामागे एखादा देशविघातक कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संवादामुळे हे साधे घुसखोरीचे प्रकरण नसून राष्ट्रीय सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणगाव न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तिन्ही आरोपींचा जामीन फेटाळून लावला आहे. आता पोलीस या 'सलमान' नावाच्या व्यक्तीचा चेहरा आणि त्याचा खरा हेतू शोधण्यासाठी तांत्रिक तपासाचा वेग वाढवत आहेत.
