जेवण आणि चटपटीत खाद्यपदार्थातील प्रमुख घटक असलेल्या कांद्याच्या दरात अवघ्या चार दिवसांत जवळपास दुपटीनं वाढ झाली आहे. 450 रुपयांना असलेली कांद्याची 40 किलोची गोणी आता 800 रुपयांवर पोहोचली आहे. मालाचा तुटवडा भासत असल्याने दरवाढ होत असल्याची प्रतिक्रिया कांद्याच्या वाढलेल्या भावावर व्यापाऱ्यांनी दिली.
उन्हाळ्याच्या सुरुवातीला कांद्याच्या गोणीचे दर 200 ते 250 रुपये होते. तर अखेरीस येणाऱ्या रांगडा कांद्याचे भाव सुरुवातीला 350 रुपये गोणी होते. मात्र, मालाची मुबलकता कमी असल्याने भाव वाढून 400 ते 450 पर्यंत गेले. पावसाळ्याची सुरुवात होत नाही तोच दर जवळपास दुपटीने वाढून बाजार समितीत कांद्यांचे दर 800 रुपये प्रति गोणी झाली आहे. ही दरवाढ गोणी मागे 350 रुपये, क्विंटल मागे 875 रुपये (56 टक्के) इतकी झाली आहे. यंदा अगोदरच उत्पादन 30 टक्के कमी आले आहे. त्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने 25 टक्के कांदा खराब झाल्याने दर वाढ झाल्याचे बाजार समितीतील घाऊक व्यापारी गुलाबशेठ चुभरा यांनी सांगितले. मंगळवारपासून पुढचे तीन दिवस पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे आवक कमी झाली तर दर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे.
advertisement
