पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी चोपड्याकडून जळगावकडे येणाऱ्या मार्गावर नाकाबंदी केली होती. यावेळी एका संशयित कारला पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला. मात्र, चालकाने कार न थांबता घटनास्थळावरून वेगाने पळ काढला. पोलिसांनी लगेचच कारचा पाठलाग सुरू केला.
पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात आल्यावर कार चालकाने धरणगाव बस स्थानकाजवळून यू-टर्न घेतला आणि पारोळा रस्त्याकडे वळवली. पुढे झाडाझुडपांच्या आड कार सोडून दोन्ही आरोपी फरार झाले. पोलिसांनी कारची तपासणी केली असता, त्यात तब्बल ४० किलो गांजा सापडला, ज्याची किंमत अंदाजे १० लाख रुपये आहे. गांजा आणि कारसह एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
advertisement
पोलिसांनी केलेल्या या पाठलागाचे थरारक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.