मुक्ताईनगर हा मतदारसंघ एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकनाथ खडसे यांना उमेदवारी न देता त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देऊन एकनाथ खडसे यांचे वर्चस्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. त्यातच भाजपकडून उमेदवारी देऊन सुद्धा भाजपच्या काही मंत्र्यांनी रोहिणी खडसे यांच्या विरोधात अपक्ष व राष्ट्रवादी पुरस्कृत असलेले उमेदवार चंद्रकांत पाटील पाठबळ दिल्याने रोहिणी खडसे यांचा पराभव झाला असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता.
advertisement
एकीकडे उमेदवारी न देता वर्चस्व संपवण्याचा प्रयत्न व मुलीला उमेदवारी देऊन पराभवाला कारणीभूत ठरलेल्या भाजपला एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी राम राम ठोकत शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन खडसेंचे पुनर्वसन करण्यात आले. दरम्यान राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर रोहिणी खडसे यांच्यावर देखील पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहिणी खडसे यांच्या उमेदवारी बाबत देखील घोषणा केली. त्यामुळे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून रोहिणी खडसे यांचे नाव निश्चित झाले आहे
एकीकडे राष्ट्रवादीकडून रोहिणी खडसे यांची उमेदवारी निश्चित झाली असताना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जातेय. चंद्रकांत पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता व त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने निवडून आलेले चंद्रकांत पाटील हे यांच्यासमोर राष्ट्रवादीने रोहिणी खडसे यांच्या आवाहन उभे केले आहे. मात्र, प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार उभा करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे प्रतिस्पर्धी म्हणून जो समोर येईल त्याला अंगावर घेण्याची तयारी आपण केली असल्याची प्रतिक्रिया आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
वाचा - राष्ट्रवादीतल्या संघर्षाची निवडणूक आयोगात सुनावणी, अजित पवार गटाचे शरद पवारांवर सनसनाटी आरोप
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देऊन चंद्रकांत पाटील यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आणत एकनाथ खडसेंना मोठा धक्का दिला होता. मात्र, तेच एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीत असल्याने राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटलांसमोर आवाहन उभे करण्यात आले आहे. त्यामुळे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
