आबिद हुसेन शेख जलील असं अटक केलेल्या ३८ वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो स्कूल बस चालक आहे. ज्या मुलीला तो दररोज शाळेत सोडायला आणि आणायला जात होता, त्याच मुलीवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी पाचोरा तालुक्यातील एका खासगी शाळेत शिक्षण घेते. आरोपी आबिद हा देखील याच शाळेत स्कूल बस चालक म्हणून काम करतो. आरोपीनं पीडित मुलीला एका शेतात घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.
खरं तर दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पीडितेचा जबाब घेतला असता हा केवळ विनयभंग नव्हे तर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण असल्याचं समोर आलं. पुरवणी जबाबात पीडितेनं बस चालकाने आपल्यावर बलात्कार केल्याचा जबाब दिला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित 38 वर्षीय बस चालक अबिद हुसेन शेख जलील याला अटक केली. त्याच्याविरुद्ध बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.