मुकेश रमेश शिरसाठ असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो जळगावातील पिंप्राळा हुडको परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता. पाच वर्षांपूर्वी त्याने याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत पळून जाऊन विवाह केला होता. तेव्हापासून मुलीच्या कुटुंबीयांसोबत तरुणाचा वाद सुरू होता. दरम्यान, या दाम्पत्याला तीन वर्षांची एक मुलगीही आहे. शिवाय मृत मुकेशची पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती देखील आहे. दोघांचा सुखाने संसार सुरू असतानाही मुलीच्या घरच्यांचा मुकेशवरचा राग कमी झाला नाही. अखेर लग्नाच्या पाच वर्षांनी मुलीकडील कुटुंबाचा राग उफाळून आला, आरोपींनी कोयता आणि चॉपरने वार करत तरुणाचा जीव घेतला आहे.
advertisement
घटनेच्या दिवशी रविवारी सकाळी मुकेश दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्यावेळी मुलीच्या माहेरील मंडळींनी कोयता आणि चॉपरने त्याच्या मानेवर वार केला. त्यात मुकेशचा जागीच मृत्यू झाला. मुकेशची हत्या केल्यानंतर हल्लेखोरांनी मयताचा भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ आणि चुलत बहीण यांच्यावरही वार केले. या हल्यात मुकेशच्या घरचे जखमी झाले आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तरुणीचा भाऊ, काका यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मयत मुकेशच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी व मुलगी आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतले आहे. परिसरात तणाव असल्यामुळे पोलिसांनी पिंप्राळा हुडको परिसरात मोठा बंदोबस्त लावला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
