दिपक रामकृष्ण भोई आणि राजेंद्र भिला भोई असं अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहे. घटनेच्या दिवशी दोघंही दुचाकीनं नॅशनल हायवे क्रमांक सहावरून जात होते. जळगाव-पारोळा रोड दरम्यान असलेल्या एरंडोल येथील शनी मंदिराजवळून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने त्यांना जोरदार धडक दिली. यात धडकेत दिपक रामकृष्ण भोई, राजेंद्र भिला भोई या दोघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी संतप्त नागरिकांनी एरंडोल महामार्गावर टायर पेटवत रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या नऊ महिन्यापूर्वी एरंडोल येथील नागरिकांनी महामार्गावर होणारे अपघात लक्षात घेता अंडर बायपास एरंडोल येथे व्हावा आणि त्याच्या बाजूला समांतर रस्ते व्हावे, या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. मात्र लेखी आश्वासन देऊनही यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. यामुळे नऊ महिने उलटूनही कामाला सुरुवात न झाल्याने एरंडोलसह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत अंडर बायपासच्या कामाला महामार्ग प्रशासन सुरुवात करणार नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा यावेळी स्थानिकांनी घेतला आहे.
