या घटनेची मिळताच पोलीस पाळधी गावात दाखल झाले. तोपर्यंत जाळपोळ करणारे तरुण पळून गेले होते. पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला असून जाळपोळीला कारणीभूत असलेल्या तरुणांची धरपकड सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू होता. घटनास्थळावरून आरोपी पळून गेल्याने परिस्थिती नियंत्रणात असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या रात्री जळगावातील पाळधी गावातून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी कुटुंबीयाला घेऊन एक गाडी चालली होती. यावेळी या गाडीच्या वाहनचालकाने हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने गावातील काही तरुणांनी चालकास शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे. वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणाऱ्या तरुणांवर काही शिवसैनिक धावून गेले. यानंतर दोन गट आमने सामने आली आणि त्यातूनच ही दगडफेक व जाळपोळीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाळधी गावात धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून सद्यस्थितीत पाळधी गावात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच दगडफेक व जाळपोळ करणारे संशयित हे पसार झाले असून रात्री उशिरापर्यंत संशयीतांचा पोलिसांकडून शोध सुरू होता.
advertisement
या घटनेची अधिक माहिती देताना धरणगावचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी सांगितलं की, पाळधी गावात झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेविरोधात अज्ञात 25 ते 30 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील 9 ते 10 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी पाळधी गावात ठांड मांडून बसले आहेत. साधारण बारा ते पंधरा दुकानं जळाली आहेत. यात साठ लाखाहून अधिकचं नुकसान झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी गावात संचारबंदी लागू केली आहे.
