लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांत मतदानाची टक्केवारी जरी घटली असली तरी मात्र चौथ्या टप्प्यात झालेल्या रावेर लोकसभा मतदारसंघात 2019 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. 2019 मध्ये रावेर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी 61.40% होती तर यावेळी मात्र रावेर लोकसभा मतदारसंघात 64.28 टक्के मतदान झाले आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचा केळी पिक विम्याचा प्रश्न, वेळेवर आधारित उद्योग व्यवसाय, बेरोजगारी, विकासात्मक कामे तसेच सिंचन योजनेची कामे हे या निवडणुकीत कळीचे मुद्दे पाहायला मिळाले. यावरूनच दोन्ही उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप देखील रंगले होते. रावेर लोकसभा मतदारसंघाची राजकीय परिस्थिती पाहता एकनाथ खडसे यांचा हा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे या मतदारसंघावर एकनाथ खडसे यांचे मोठे प्राबल्य आहे. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीचा परिणाम यामुळे यंदा एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नव्हती, त्यातच मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने रक्षा खडसे यांना एक मोठे आव्हान निर्माण झाले होते.
advertisement
मात्र निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे यांनी भाजप घरवापसी करण्याचा निर्णय घेतल्याने रक्षा खडसे यांना मोठे पाठबळ मिळाले. पण सासरे एकनाथ खडसे हे जरी पाठीशी असले तरी मात्र नणंद रोहिणी खडसे यांनी भावजयी रक्षा खडसे यांच्या विरोधात प्रचार केला. त्यामुळे घरातूनच रक्षा खडसे यांना मोठे आव्हान निर्माण झाले होते. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात उमेदवारीवरून जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील व माजी आमदार संतोष चौधरी यांच्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. पण ऐनवेळी पक्षाकडून रावेर मधील उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने संतोष चौधरी यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजी नाट्य देखील पाहायला मिळाले तर हे नाराजी नाट्य दूर करण्यासाठी स्वतः शरद पवार व जयंत पाटील यांना मध्यस्थी करावी लागली.
रक्षा खडसे यांच्या विरोधात नवा कोरा चेहरा असलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर स्वतः शरद पवार यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात दोन वेळा दौरे करून श्रीराम पाटील यांचा प्रचार केला. खरंतर भाजपच्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्याने रक्षा खडसे यांनी संपूर्ण मतदारसंघ हा पिंजून काढला व सोबतच रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अमरावती मधील उमेदवार नवनीत राणा यांनीही रोडशो केला. त्यामुळे प्रचारातही रक्षा खडसे यांची आघाडी पाहायला मिळाली.
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून रक्षा खडसे तर काँग्रेस कडून डॉ. उल्हास पाटील यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी तीन लाखापेक्षा अधिक मताधिक्याने रक्षा खडसे यांचा विजय झाला होता.
2019 लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेली एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता व राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना एमएलसी देऊन खडसेंचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची पक्षाकडून एकनाथ खडसे यांना ऑफर देण्यात आली व ही ऑफर स्वीकारत एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी देखील सुरू केली.
मात्र बदलत्या राजकीय घडामोडींमुळे व प्रकृती अस्वस्थ्यामुळे एकनाथ खडसेंनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. व त्यातच एकनाथ खडसे यांना भाजप घरवासी करण्याचे वेध लागले व खडसेंचा हा निर्णय सून रक्षा खडसे यांना मोठे पाठबळ देणारा ठरला. पण खडसेंनी जरी घरवापसीचा निर्णय घेतला असला तरी मात्र त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांच्या सोबतच राहणे पसंत केले. त्यामुळे या निवडणुकीत रोहिणी खडसे यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा प्रचार केल्याचे पाहायला मिळाले.
