जालना : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे हे त्यांच्या भाषणामुळे आणि साधेपणामुळे सतत चर्चेत असतात. महिन्याभरापूर्वी रावसाहेब दानवे यांनी केलेल्या मका पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मक्याचं कणीस निखाऱ्यांवर भाजून दानवेंनी खाल्लं होतं. आता विधानसभेची धामधूम सुरू असताना रावसाहेब दानवे हातात काठी घेऊन कार्यकर्त्यांना सभेला चला म्हणत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
advertisement
भाजपकडून रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे यांना भोकरदन विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज दाखल कऱण्याचा शेवटचा दिवस होता. संतोष दानवे यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. पण अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी नव्हती. तेव्हा रावसाहेब दावने स्वत: रस्त्यावर उतरले.
रावसाहेब दानवे यांनी रस्त्यावर उतरून थेट काठीच हातात घेतली. कार्यकर्त्यांच्या मागे जात त्यांना सभेला चला, सभेला चला असं म्हणण्याची वेळ आली. मुलाच्या सभेसाठी कार्यकर्ते जमवणाऱ्या माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भोकरदन विधानसभा मतदारसंघात भाजपकडून संतोष दानवेंना उमेदवारी दिलीय. तर त्यांच्याविरोधात शरद पवार गटाने माजी आमदार चंद्रकांत दानवे यांना उमेदवारी दिलीय. भोकरदनमध्ये २०१४ पासून भाजपचे वर्चस्व आहे. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभवाचा धक्का बसला. यात दावनेंविरोधात प्रचार करणाऱ्यांमध्ये माजी आमदार चंद्रकांत दानवे हे आघाडीवर होते. आता त्यांनाच शरद पवार गटाने रावसाहेब दानवेंच्या मुलाविरोधात मैदानात उतरवलंय.
