जालना: जालना महानगरपालिकेचा आयुक्त असलेल्या संतोष खांडेकर यांना 10 लाखांची लाच स्विकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना घडली आहे. महानगरपालिका आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी ही कारवाई् करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने केलेल्या कारवाईनंतर कंत्राटदारांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला.
advertisement
कंत्राटदाराला घरीच रोकड घेऊन बोलावलं अन् जाळ्यात अडकला...
संतोष खांडेकर यांनी एका कंत्राटदाराकडे 10 लाख रुपयांची रोकड घेऊन घरी बोलावलं होतं. या लाचेची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे कंत्राटदाराने दिली. त्याच्या या तक्रारीवर सापळा रचून संतोष खांडेकर यांना 10 लाखांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आयुक्त संतोष खांडेकर यांना ताब्यात घेऊन एसीबी कार्यालयात आणल्यानंतर एसीबी कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी झाल्याचे देखील पहायला मिळाले. तसेच या कारवाईसोबत आता लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने संतोष खांडेकर यांच्या घराची झाडाझडती घेतली.
>> कोण आहेत संतोष खांडेकर?
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचे संतोष खांडेकर हे सध्या जालना महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पोलीस खात्यातून प्रशासन सेवेत प्रवेश केला.
संतोष खांडेकर यांनी जवळपा, 6 वर्षे पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली. त्यानंतर त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत शासकीय सेवेत वर्ग-2 अधिकारी म्हणून प्रवेश केला.
सन 2022 मध्ये जालना नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 9 मे 2023 रोजी जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाले आणि त्याच वेळी महानगरपालिकेचे पहिले आयुक्त म्हणून संतोष खांडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी जालना महानगरपालिकेच्या प्रशासक पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली.