जालना, 12 सप्टेंबर : मनोज जरांगे-पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या अतरावली-सराटी गावात मागील १५ दिवसांपासून आंदोलन सुरुच आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा जरांगे-पाटलांची समजूत काढण्यासाठी संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर यांनी जरांगे-पाटलांची भेट घेतली, यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारपुढे 5 अटी ठेवल्या. जर वेळ दिला तर आंदोलन बंद होणार नाही, आंदोलन सुरूच राहील. माझ म्हणणं आहे एक महिना दिला पाहिजे, मात्र मी ही जागा सोडणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
advertisement
प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय घराचा उंबरा शिवणार नाही, लेकरं बाळांच तोंड पाहणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी विचारला आहे. टिकणाऱ्या आरक्षणासाठी सरकारला हा महिना द्यावा, असं मला वैयक्तिक वाटतं, अशी भावना जरांगे पाटील यांनी बोलून दाखवली.
तुम्ही म्हणाल तो निर्णय घेऊ, काय करायचं ते एकमताने सांगा, असं आवाहन जरांगे पाटील यांनी उपोषणस्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांना केलं, त्यावेळी नागरिकांनी होकार दिला. अर्धे मराठे माझ्या मागे लागले आहेत, दोन पावलं मी जातीसाठी मागे सरकतो, माझ्या जातीला कुणी बदनाम करू नये. आमरण उपोषण सोडायला तयार आहे, त्याचे रुपांतर साखळी उपोषणात करू, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. याचसोबत जरांगे पाटील यांनी पाच मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत.
जरांगे पाटलांच्या पाच मागण्या
1 अहवाल कसाही असो, मराठ्यांना 31 व्या दिवशी प्रमाणपात्र वाटप करायला सुरुवात झाली पाहिजे. एक महिन्याची वेळ देण्यासाठी एकमताने समाज बांधवांनी दोन्ही हात उंचावून समर्थन दर्शवले.
2 महाराष्ट्रातूनच जेवढे गुन्हे दाखल तेवढे मागे घ्यावे
3 दोषींना निलंबित करा
4 मुख्यमंत्री, दोन्ही उप मुख्यमंत्री मंत्रिमंडळ त्यांच्या बरोबर संभाजी राजे भोसले बरोबर आले पाहिजे. उदयन राजेंना मध्यस्थी ठेवणार दोन्ही राजे मध्यस्थी पाहिजे.
5 सरकारने लिहून द्यायचं टाईम बाँड द्यायचं.
या पाच मागण्या जरांगे पाटील यांनी राज्य सरकारसमोर ठेवल्या आहेत. तसंच 12 तारखेला विराट सभा घेणार असल्याचंही जरांगे पाटील यांनी जाहीर केलं. मराठ्यांनी आजपासून कामाला लागलं पाहिजे, देशभरात मराठा नाव ऐकलं की थरकाप उडाला पाहिजे. ज्या दिवशी तुमच्या हातात प्रमाणपत्र दिसेल त्या दिवशी मी उपोषण सोडेन, एवढी जाहीर सभा घेऊ. महिनाभर गावागावात साखळी उपोषण सुरू करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.