जालना: संपूर्ण देशभर धुलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. रंगांच्या या उत्सवामध्ये प्रत्येक जण अतिशय उत्साहाने सहभागी होत आहे. धुलिवंदनच्या निमित्ताने देशभरात वेगवेगळ्या प्रथा परंपरा देखील पाहायला मिळतात. जालना शहरात देखील 136 वर्ष जुनी हत्ती रिसला मिरवणुकीची परंपरा आहे. याच अनोख्या परंपरेबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
जालना शहरात पूर्वी 10 ते 15 दिवस होळीनिमित्त रंग खेळले जायचे. परंतु या दरम्यान नागरिकांत अनेक वाद विवाद होत असत. एकदा निर्माण झालेला वाद वर्षभर कायम राहायचा. यामुळे हे कुठेतरी कमी व्हावे म्हणून सर्व समाज बांधव एकत्र आले आणि हत्तीवरून प्रतिकात्मक राजा, प्रधान आणि भारत मातेची मिरवणूक काढण्याचं ठरवण्यात आलं. हत्तीवरून राजा आणि प्रधानाची मिरवणूक ज्या ज्या रस्त्यावरून जाईल तिथे तिथे रंग खेळणे बंद करण्याची परंपरा 1889 पासून सुरु झाली. हीच परंपरा आजतागायत सुरू आहे.
advertisement
धुलिवंदनाचं निमित्त आणि बाप्पाला 2000 किलो द्राक्षांचा नैवेद्य! श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे PHOTO
यादरम्यान राजा आणि प्रधानावर रंग आणि पाणी उधळले जाते. तर राजा आणि प्रधान प्रजेच्या अंगावर रेवड्या उधळतो. या रेवड्या प्रसाद म्हणून जालना शहरातील नागरिक स्वतःकडे ठेवतात. अशा पद्धतीची ही परंपरा आहे. मागील काही वर्षांमध्ये मराठवाड्यात पाण्याचं असलेलं दुर्भिक्ष लक्षात घेता पाण्याऐवजी फुलांची उधळण करून व कोरड्या रंगाने होळी खेळण्याची परंपरा हत्ती रिसला समितीने सुरू केली आहे. यंदा देखील केवळ फुलांची उधळण आणि कोरड्या रंगाने होळी खेळण्यात आली. आगामी वर्षांमध्ये देखील ही परंपरा अशीच कायम राहील, असं समितीचे अध्यक्ष अंकुश राऊत यांनी सांगितलं.
या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष कुमार नोपानी, खासदार डॉ. कल्याण काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. जालना शहरवासीयांनी सुरू केलेली ही परंपरा अत्यंत स्तुत्य आहे. यामुळे समाजात होणारे वाद-विवाद कमी होऊन आनंद उत्साह आणि एकोप्याने होळी खेळण्याची प्रेरणा मिळत असल्याचं खासदार काळे यांनी सांगितलं.