जालना : भाजी खरेदीसाठी आलेल्या माजी सरपंचावर तलवार आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात असलेल्या जांगडे पेट्रोल पंपासमोर घडली. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हत्या करण्यात आलेल्या माजी सरपंचाचे नाव बाबासाहेब सोमधाने असे असून ते जालना तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथील रहिवासी होते. सोमधाने भाजी आणण्यासाठी चौफुली परिसरात आले असताना टाटा सुमो गाडीतून आलेल्या चार अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. तलवारीचे वार आणि लोखंडी रॉडने केलेल्या जबर मारहाणीत सोमधाने गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद
घटनेनंतर आरोपींनी टाटा सुमो गाडी घटनास्थळीच सोडून दिली असून ते स्विफ्ट डिझायर गाडीने फरार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून पोलिस त्याच्या आधारे तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच जालना शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत.
आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके
हत्या कोणत्या कारणावरून करण्यात आली याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी वैयक्तिक वाद, जुना शत्रुत्वाचा संशय किंवा राजकीय कारणामुळे हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून शहरातील नाकाबंदीही वाढवण्यात आली आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेमुळे जालना जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिस अधिक तपास करत असून लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा :
