जालना: स्वच्छतेचे महामेरू म्हणून राष्ट्रसंत गाडगेबाबा आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत. त्यांच्या नावे ग्राम स्वच्छता अभियान राज्यभर राबवले जाते. मात्र असं असतानाही अनेक खेडेगावांत अजूनही स्त्रियांना उघड्यावर शौचाला जावं लागतं. हीच बाब लक्षात आल्यानंतर जालना जिल्ह्यातील एका आधुनिक स्वच्छता दूताने स्वखर्चाने तब्बल 205 शौचालयांची निर्मिती केली आहे. प्रसंगी स्वत:ची दीड एकर जमीन विकली, बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवलं आणि तब्बल 205 शौचालयांचं बांधकाम स्वखर्चातून केलं. याच कार्याबाबत सविता आणि बाबासाहेब शेळके दाम्पत्यानं लोकल18 सोबत संवाद साधला.
advertisement
दीड एकर शेती विकली
गावामध्ये शौचालयांची सुविधा नसल्याने गरोदर स्त्रिया, लहान मुले व वृद्ध व्यक्तींची आबाळ व्हायची. पावसाळ्यात चिखल तुडवत बाहेर उघड्यावर शौचाला जावे लागायचे. हीच बाब लक्षात घेऊन 2009-10 पासून मी माझ्या पत्नीच्या साह्याने गावामध्ये स्वखर्चातून शौचालयांचे बांधकाम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला जवळ असलेल्या पैशातून हे काम करायचो. मात्र पैशांची चणचण भासू लागल्याने आमच्या 3 एकर शेती पैकी दीड एकर शेती विकली. यानंतरही गावातील शौचालयाचे काम पूर्ण न झाल्याने विविध बँकांकडून कर्ज काढली. तरी देखील गावातील काही लोकांची शौचालये झालेली नव्हती. तेव्हा पत्नी सविता शेळके यांच्या सहमतीने त्यांचे मंगळसूत्र गहाण ठेवून शौचालय निर्मितीचे काम सुरू ठेवलं, असं बाबासाहेब शेळके सांगतात.
गावात फुलवली वनराई
आता संपूर्ण गावामध्ये प्रत्येक घरी शौचालय आहे. अबालवृद्ध, गरोदर स्त्रिया बाहेर उघड्यावर शौचाला न जाता शौचालयांचा वापर करतात. यामुळे गावात रोगराई कमी प्रमाणात पसरून त्यांचं व गावचाचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. याचबरोबर गावात आम्ही वनराई प्रकल्प फुलवला असून यामध्ये तब्बल 8500 झाडांचे संगोपन करत आहोत. पत्नी सविता शेळके आणि आमची मुलं यांचे देखील या कामामध्ये आम्हाला सहकार्य असतं, असं बाबासाहेब सांगतात.
विविध पुरस्कारांनी सन्मान
शेळके दांपत्याच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना विविध जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आला आहे. स्वच्छते प्रति एवढी जागरूकता ग्रामीण भागातील एका नागरिकाला हेच मुळात आश्चर्यचकित करणारे. मात्र शेळके दांपत्य आपल्या संकल्प वर ठाम असून यापुढेही स्वच्छतेचे ही कार्य अविरतपणे सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वखर्चातून गावासाठी शौचालयांची निर्मिती करणार हे दांपत्य खरोखरच कौतुकास पात्र असून राज्यातील नवे स्वच्छता दूत म्हणून त्यांची ओळख होत आहे.