मागील वर्षीच बहिणीचे लग्न केलं. लग्न करण्यासाठी चार ते पाच लाखांचा खर्च आला. हा खर्च बँक आणि सावकाराचं कर्ज काढून केला. कर्ज फेडायचं म्हणून कपाशीवर मोठा खर्च केला. नुकतंच 40 हजारांचं खत कपाशीला घातलं होतं. परंतु राजाकुंडी नदीचं पाणी शेतामधून गेलं आणि पिकाबरोबर स्वप्न देखील जमीनदोस्त झाल्याचं शेतकरी सांगतात.
advertisement
जालना जिल्ह्यात 21 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने जिकडे तिकडे हाहाकार उडाल्याचे चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. जनावरांचे गोठे वाहून गेले असून अनेक जनावरे देखील मृत पावली आहेत. नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
जालना तालुक्यातील मानेगाव येथील बळीराम पोहेकर हे देखील त्या शेतकऱ्यांपैकी एक आहेत. मानेगाव येथून वाहणाऱ्या राजा कुंडी नदीचा प्रवाह फुटल्याने तो प्रवाह शेतातून निर्माण झाला. आणि पाच एकरातील संपूर्ण कपाशी आडवी झाली. याच कापसावर या शेतकऱ्यानं अनेक स्वप्न फुलवली होती. परंतु आता अंधकारमय दिवाळी साजरी करण्याशिवाय या शेतकऱ्यापुढे पर्याय नाही. मायबाप सरकारने भरीव मदत करावी जेणेकरून आम्ही या आपत्तीच्या विळख्यातून बाहेर येऊ शकू, अशी अपेक्षा बळीराम पोहेकर यांनी व्यक्त केली.