मंगळवारी, 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वंदे भारत एक्स्प्रेस जालना रेल्वे स्थानकाकडे येत असताना मुक्तेश्वर तलावाजवळ रेल्वे ट्रॅकवर अचानक एक म्हैस आडवी आली. तेव्हा म्हशीला रेल्वेची जोरदार धडक बसली. यामुळे ट्रेनच्या पुढील भागातील 'नोज हेड'चे मोठे नुकसान झाले. सुदैवाने, रेल्वेचे इतर कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.
advertisement
वंदे भारत एक्स्प्रेसची म्हशीला धडक बसल्याने अपघात झाला होता. यात रेल्वेचे किरकोळ नुकसान झाले होते. दुरुस्तीनंतर ट्रेन पुन्हा नांदेडकडे रवाना झाली. रेल्वे ट्रॅकवर जनावरे अचानकपणे आल्यामुळे असे अपघात होतात, असं दक्षिण मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी सांगितले.
अपघातानंतर ट्रेन सुमारे 40 मिनिटे ट्रॅकवर उभी राहिली. यामुळे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर रेल्वे जालना स्थानकावर पोहोचली. त्यानंतर पुढे नांदेडकडे रवाना करण्यात आली.
यापूर्वी बैलाला धडक
यापूर्वीदेखील जानेवारी 2024 मध्ये याच वंदे भारत एक्सप्रेसने लासूर स्थानकाजवळ एका बैलाला धडक दिल्याने अपघात झाला होता. ही वंदे भारत ट्रेन नांदेड ते मुंबई असा प्रवास जालनामार्गे करते आणि परत याच मार्गाने नांदेडला येते.






