आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये पाऊस सक्रिय झाला आहे. जालन्यात शनिवारी धारकल्याण परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळी वाऱ्यामध्ये धारकल्याण येथील रंगनाथ भुतेकर यांच्या घरावरील तब्बल 28 पत्रे म्हणजेच संपूर्ण छप्पर उडून गेले. घरातील सात ते आठ गोण्या गहू, चार ते पाच गोण्या ज्वारी, एक ते दोन गोण्या बाजरी, एक क्विंटल कांद्याचे बी, त्याचबरोबर घरातील डाळी, पापड इत्यादी गृह उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे.
advertisement
सध्या त्यांनी आपल्या घरातील सामान गावातील एका शेजाऱ्याच्या घरात हलवले आहे. अन्नपाण्याची तात्पुरती व्यवस्था केली आहे. परंतु राहण्यासाठी निवारा नसल्याने शासनाने तात्काळ पंचनामा करून किमान 2 लाख रुपये तातडीची मदत करावी, अशी मागणी रंगनाथ भुतेकर यांनी लोकल 18 शी बोलताना केली आहे.
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चक्रीवादळासारखा वारा सुटला. आम्ही घरातच होतो. घराबाहेर असलेल्या गाडीवर पत्र्यावरील दोन-तीन दगड पडले. त्यामुळे गाडीचे नुकसान झाले. तितक्यात आम्ही सगळे घराच्या बाहेर आलो. तेवढ्यात जोराच्या आलेल्या वादळाने घरावरील सगळे पत्रे उडून गेली. घरात असलेली गहू, ज्वारी, बाजरी भिजली. बी-बियाणे आणि खत खरेदी केले होते. सिमेंटच्या काही गोण्या होत्या. या सगळ्यांचे नुकसान झाले. कमीत कमी दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने 2 लाखांची तरी मदत करावी, अशी मागणी रंगनाथ भुतेकर यांनी केली आहे.