जालना : पोटाच्या भुके पुढे जात, धर्म, पंथ, संप्रदाय या गोष्टी शिल्लक ठरतात हे आपल्याला नेहमीच लक्षात येत असतं. मूळचे नागपूर येथील असलेले शेख कुटुंब ही देखील याचं मूर्तीमंत उदाहरण. सर्व धर्मातील देवीदेवतांची गाणी तसेच देशभक्तीपर गाणी गाऊन ते लोकांचं मनोरंजन करतात आणि यातूनच स्वतःच्या पोटाची खळगी भरतात. त्यांच्या वडिलांपासून चालत आलेल्या या व्यवसायात सादिक शेख यांनी जीव दिला आहे. त्यांच्याबरोबरच त्यांची पत्नी आणि मुले देखील त्यांना साथ देतात. पाहुयात सादिक शेख हे या कलेकडे कसे वळले.
advertisement
मूळ विदर्भातील नागपूर येथील असलेले शेख कुटुंब सध्या जालना जिल्ह्यातील अंबड इथे वास्तव्यास आहे. खेडेगावातील आठवडी बाजार, छोट्या शहरातील गर्दीची ठिकाणे आणि मोठ्या शहरांमध्ये रिकाम्या जागेत सत्तरंजी अंथरूण ते देशभक्तीपर तसेच विविध महापुरुष आणि देवी देवतांची गाणी सादर करून लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात.
सादिक शेख यांचा सुरेल आवाज आणि त्यांच्या पत्नीने दिलेली ढोलकी वरची थाप याने आजूबाजूची मंडळी यांची पावले आपसूक त्यांच्याकडे वळतात. क्षणभर थांबून प्रत्येक जण या सुरेल गाण्यांचा आस्वाद घेतो आणि आपल्या खिशात हात घालून 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत दानधर्म या कुटुंबाला करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध खेडोपाडी आणि शहरांमध्ये भटकंती करून आपली उपजीविका शेख कुटुंब मागील 40 वर्षांपासून करत आहेत.
'माझ्या वडिलांपासून मी या व्यवसायात आहे. सोबत माझ्या कुटुंबातील ही सदस्य देखील आहेत. सर्व धर्माची गाणी आम्ही सादर करतो. देशभक्तीपर गाणे, कव्वाली, छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी या गाण्यांना प्रेक्षकांमधून मोठी मागणी असते. 100 रुपये दिल्यानंतर लोकांची फर्माईश पूर्ण केली जाते. पोटाच्या पुढे जात, अधर्म आणि देव कोणीही आडवा येत नाही. पोटासाठी सर्व काही करावा लागतो. कलेची कदर करणारे लोक थांबतात, गाण्यांचा आस्वाद घेतात आणि दानधर्मही करतात. अशाच पद्धतीने आम्ही 40 वर्षांपासून हे काम आम्ही करत आहोत. आणि यापुढेही करत राहू' असं सादिक शेख यांनी सांगितलं.
पोटाची भूक भागली आणि सर्व मूलभूत गरजा पूर्ण होऊ लागल्या की अनेकांना जात आणि धर्म मोठे वाटू लागतात. परंतु जेव्हा पोटाला मिळणारी भाकर हेच अंतिम उद्दिष्ट शिल्लक राहते तेव्हा जात, धर्माच्या बेड्या गळून पडतात हेच सादिक शेख यांच्याकडे पाहून लक्षात येते. एक सादिक यांच्यासारखी असंख्य मंडळी केवळ लोकांचे मनोरंजन आणि पोटाची खळगी यासाठीच जाती धर्माच्या बेड्यातून काम करत आहेत. हे लोककलावंतच भारतीय संस्कृतीचे खरे रक्षक आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये.





