जालना : तुळशी विवाह संपन्न होताच हिंदू धर्मातील शुभविवाह सुरू झाले आहेत. सध्या तर लग्न समारंभाचा सीजन जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. लग्न म्हटलं की अनेक गोष्टी येतात. त्यापैकीच एक म्हणजे वऱ्हाडी मंडळींना लग्नाच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था. अनेक जण खाजगी गाड्या यासाठी बुक करतात. तर काही जणांचा लांब पल्ल्याचे ठिकाण असेल तर एसटी महामंडळाच्या बस बुक करण्याकडे देखील कल असतो. अतिशय कमी दरांमध्ये आणि सुरक्षित प्रवासाची हमी असलेल्या एसटी बस विवाह सोहळ्यासाठी बुक करायच्या असल्यास काय प्रक्रिया आहे हे आम्ही राज्य परिवहन महामंडळाच्या जालना आगाराचे व्यवस्थापक अजिंक्य जैवल यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहुयात.
advertisement
जालना येथील बस आगारामध्ये विवाह सोहळ्यासाठी बस बुकिंगची सोय करून देण्यात आली आहे. यासाठी संबंधित व्यक्तीने पंधरा दिवस आधी अर्ज करणे आवश्यक असणार आहे. उपलब्धतेनुसार एसटी महामंडळाकडून संबंधित व्यक्तीला बस उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी 24 तासांसाठी कमीत कमी 300 किलोमीटर अंतराचे भाडे आकारले जाईल. तर 55 रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे एका बसचे भाडे आकारण्यात येईल.
शिवरायांचा भव्य पुतळा, निसर्गरम्य वातावरण, पर्यटनासाठी अमरावतीमधील अतिशय सुंदर असं लोकेशन
म्हणजेच 24 तासांसाठी एसटी महामंडळाची एक बस किमान 16,500 एवढं भाडं घेईल. 300 किमी पेक्षा अधिक अंतर पूर्ण केल्यास त्यापुढील भाडे हे 55 रुपये प्रति किलोमीटर या दराने अधिकचे मोजावे लागतील. परंतु बसने 300 किमी पेक्षा कमी प्रवास केल्यास 16,500 एवढं भाडं हे अदा करावंच लागेल.
त्याचबरोबर डिसेंबर महिन्यापासून सहलीसाठी देखील एसटी महामंडळाकडून बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शिक्षणाधिकारीचे ना हरकत प्रमाणपत्र सोबत जोडल्यास आणि विद्यार्थ्यांची पूर्ण यादी दिल्यास 50 टक्के सवलतीत शालेय विद्यार्थ्यांना सहलीसाठी बस उपलब्ध करून दिली जाते. शुभविवाहासाठी तसेच सहलीसाठी नागरिकांनी सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देऊन एसटी महामंडळाच्या बसेसची जास्तीत जास्त बुकिंग करावी, असं आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या जालना आगाराचे व्यवस्थापक अजिंक्य जैवल यांनी केले.





