यावर्षी जर आपण पाहिलं तर 4 मे पासूनच राज्यात सलग पाऊस सुरू आहे. तसं पाहिलं तर मे महिना हा कडक उन्हाचा असतो. जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तब्बल 125 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील 22 दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या पावसाचं कारण शोधायला गेल्यास भारताच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला असलेल्या अरबी आणि बंगालचा उपसागर या दोन्ही समुद्रामध्ये सातत्याने तयार होत असलेली कमी दाबाची क्षेत्रे आणि त्यामुळे निर्माण होत असलेली दोन्ही स्थिती पावसाला अनुकूल ठरत आहे. यामुळेच राज्यभरात मागील 20 ते 22 दिवसांपासून पाऊस होत असल्याचं हवामान तज्ज्ञ पंडित वासरे यांनी बोलताना सांगितलं.
advertisement
मान्सून देखील यावर्षी महाराष्ट्रात मे महिन्यातच दाखल झाला आहे. याआधी 2009 मध्ये मान्सून 23 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. यानंतर यंदा 24 मे रोजी तो केरळात दाखल झालाय. याला देखील वरील परिस्थितीत कारणीभूत ठरली असून यामुळे मान्सून लवकर दाखल झाला आहे. आयएमडीने देखील यंदा 104 टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. पेरणी योग्य पाऊस झाला असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. 5 जून पर्यंत शेतकऱ्यांनी धीर धरावा यानंतरच पेरणीची तयारी करावी, असं आवाहन कृषी तज्ज्ञ आणि हवामान अभ्यासक पंडित वासरे यांनी केले आहे.
देशात लवकर पोहोचलेल्या मान्सून आणि संपूर्ण मे महिन्यात झालेला पाऊस या परिस्थितीत बरोबर आकलन करता येणे थोडे अवघड आहे. परंतु या बाबीला जागतिक हवामान बदलाशी आपण जोडू शकतो, असे देखील त्यांनी लोकल 18 शी बोलताना स्पष्ट केलं.





