अजितदादांची स्पष्ट इच्छा होती – जयंत पाटील
जयंत पाटील यांनी सांगितले की, अलीकडच्या काळात अजित पवार वारंवार त्यांच्या घरी भेटीसाठी येत होते. अनेकदा संध्याकाळी जेवणासह दोघांमध्ये सविस्तर चर्चा व्हायची. “पवार साहेबांच्या उपस्थितीतच अजितदादांनी मला स्पष्टपणे सांगितले होते की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र याव्यात, ही त्यांची मनापासून इच्छा आहे. भूतकाळातील सर्व मतभेद विसरून ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षासोबत येण्यास तयार होते,” असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, जवळपास आठ ते दहा वेळा या विषयावर त्यांच्या घरी बैठकाही झाल्या होत्या.
advertisement
आज राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक
दरम्यान, आज दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत महत्त्वाचे राजकीय निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर सुनेत्रा पवार यांची निवड होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे.
शपथविधीवरून पवार कुटुंबात नाराजी
दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीच्या संपूर्ण प्रक्रियेबाबत पवार कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. इतका महत्त्वाचा निर्णय घेताना कुटुंबीयांना विश्वासात घेणे आवश्यक होते, असे मत काही सदस्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांमध्ये अजित पवार हेच प्रामुख्याने सक्रिय होते, अशी माहितीही समोर आली आहे.
