र्वोच्च न्यायालयाच्या ५२ व्या सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांची निवड झाल्याने महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयातील न्यायमुर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती सुर्यकांत, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमुर्ती आलोक आराध्य, न्या. अभय ओक, न्या. रेवती डेरे, न्या. प्रसन्न वराळे, केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नितीन जामदार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. परंतु अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे ज्या महाराष्ट्रातून सरन्यायाधीश भूषण गवई येतात, त्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या पोलीस महासंचालक यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. हीच बाब सरन्यायाधीश गवई यांना खटकली. त्यांनी जाहीर भाषणातून याविषयी नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्ट करून प्रशासनावर टीका केली आहे.
advertisement
ही संकुचित मनोवृत्ती नाही तर काय आहे?
महाराष्ट्राचे सुपुत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस.भुषण.गवई साहेब शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात आले. आज महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यात सरन्यायाधीश गवई साहेबांनी जाहीरपणे इथल्या प्रशासनाला प्रोटोकॉल न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, मुंबई पोलिस आयुक्त तसेच इतर अधिकारी कोणीच उपस्थित नव्हते. ही संकुचित मनोवृत्ती नाही तर काय आहे? असा विचारणा जितेंद्र आव्हाड यांनी केली.
मराठी मातीचा अवमान करणारे माफी मागणार काय? जात जात नाही...!
माझा प्रशासनाला जाहीर सवाल आहे मराठी मातीचा, मराठी अभिमानाचा गौरव महाराष्ट्राचे प्रशासन नाही करणार तर कोण करणार? माफी कोण मागणार? असे विचारीत पोस्टच्या अखेरीस जाता जात नाही त्याला जात म्हणतात... असे म्हणत प्रशासनाने सरन्यायाधीशांना न दिलेल्या राजशिष्टाचाराला जातीची किनार असल्याचे थेटपणे आव्हाड म्हणाले आहेत.