अवघ्या सतरा वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीच्या आयुष्यावर एका नराधमाने घाला घातला. या प्रकरणातील मुख्य आरोपी, कैलास राजेश सप्रे वय २१, रा. पाले खुर्द याला पनवेल तालुका पोलिसांनी अखेर १८ नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. पीडित मुलीने हिंमत करून तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
२०२४ पासून सुरू होती फसवणूक
advertisement
नोव्हेंबर २०२४ मध्ये, आरोपी कैलास सप्रे याने १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिला लवकरच लग्न करण्याचे खोटे आश्वासन दिले. तिला तो सतत आपण लग्न करुन म्हणून म्हणत राहिला. त्याच्या खोट्या प्रेमाला ती भुलली. युवतीनं त्याच्यावर विश्वास ठेवला. या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि याच कारणामुळे ती अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली.
मारहाणीचाही क्रूर अनुभव
एकीकडे लग्नाची खोटी आश्वासने आणि दुसरीकडे शारीरिक संबंधांतून आलेले गरोदरपण, यामुळे ती मुलगी मानसिकरित्या पूर्णपणे खचली. एवढ्यावरच हे सगळं थांबलं नाही, आरोपी कैलास सप्रे याने तिच्यावर शारीरिक अत्याचारही केले. तो तिला वारंवार दारू पिऊन मारहाण करत असे. ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, त्याच व्यक्तीकडून शारिरीक आणि मानसिक छळ होत होता. अखेर जाचाला कंटाळून तिने हिम्मत केली आणि न्यायासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
अत्याचार सहन करण्यापलीकडे गेल्यावर पीडित तरुणीने मोठे धाडस दाखवले. तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध तिने आवाज उचलण्याचे ठरवले आणि थेट पोलीस ठाण्यात जाऊन सर्व घटनाक्रम सांगितला. पीडित मुलीने तक्रार दाखल करताच पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवली. आरोपी कैलास रमेश सप्रे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध सुरू केला. पीडितेच्या तक्रारीनंतर पनवेल तालुका पोलिसांनी कोणतीही दिरंगाई न करता, १८ नोव्हेंबर रोजी आरोपी कैलास राजेश सप्रे याला बेड्या ठोकल्या आणि त्याला अटक केली.
