राज्य शासनाने मद्य विक्रीवरील व्हॅट ५ टक्क्यांवरून १० टक्के केला. परवाना शुल्कात १५ टक्के वाढ केली आणि भारतीय बनावटीच्या परदेशी मद्यावर उत्पादन शुल्कात ६० टक्क्यांनी वाढ केली आहे. ही करवाढ रद्द करावी अशी मागणी हॉटेल ओनर्स असोसिएशनने केली आहे. या करवाढीला विरोध करण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बार आणि हॉटेल व्यावसायिकांनी आज एक दिवस बार बंद ठेवले आहेत.
advertisement
हॉटेल ओनर्स असोसिएशनची बैठक आज डोंबिवली मॉर्डन प्राईड हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीला अध्यक्ष अजित शेट्टी, सेक्रेटरी सत्येश शेट्टी, प्रभाकर शेट्टी, सूकुमार नायक, राजू भंडारी, सुकेश शेट्टी, किशोर शेट्टी, विठ्ठल शेट्टी, वीजीत शेट्टी सचिन शेट्टी आणि हॉटेल मालक उपस्थित होते. बैठकीत कल्याण डोंबिवलीमधील हॉटेल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी व्यावसायिकांनी आपल्या अडचणी मांडल्या. याबाबतचे एक पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनाही पत्राची प्रत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाने करवाढ कायम ठेवली तर हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार असून, बार बंद पडण्याची शक्यता वाढली असून रोजगारावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे, असे हॉटेल ओनर्स असोसिएशनचे सेक्रेटरी सत्येश शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हॉटेल व्यवसायिक गिरीश शेट्टी यांनी सांगितले की परमिट रूम आणि वाईन शॉपमधील करात तफावत असल्याने ग्राहक हे ढाबे, चायनीज फूडच्या गाड्यावर दारू घेऊन जाऊन पितील, तसेच उघड्यावर सुद्धा दारू पिण्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळे ही करवाढ रद्द करावी, असे हॉटेल मालकांची मागणी असल्याचे सांगितले.
