मुंबईत आज सकाळपासून अवघ्या आठ तासांत १७० मिमी पाऊस झाला आहे. शहर आणि उपनगरांत पाणी तुंबल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली. ठाणे, कल्याण डोंबिवलीतही मुसळधार पाऊस पडला. पावसाने अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. इकडे बाळे, नारीवली गावात जाणारी उत्तरशिव मार्गे वाहतूक बोगद्यातील पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
गाडी बुडत असलेली पाहून चालकाने उडी मारली
advertisement
गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने १४ गावातील रेल्वेच्या बोगद्याखाली पाणी साचले होते. हा बोगदा नारिवली उत्तर शिव गावांना जोडतो. साचलेल्या पाण्यामुळे गावांमध्ये जाणारी वाट बंद होती. मात्र एका चालकाने बोगद्यात साचलेल्या पाण्यात गाडी घातली. काही मीटर पुढे गेल्यावर गाडी बुडायला लागली. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने गाडी एका जागेवर स्थिर राहू शकली नाही. काही मिनिटांत तर गाडीच्या दरवाज्याच्या वरपर्यंत पाणी आले.
काही तरुणांनी मिळून गाडी पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मुसळधार पावसामुळे पाण्याचा वेग आणि बोगद्याखाली असणाऱ्या खड्ड्यामुळे गाडी बुडत होती. अखेर बुडत असलेली गाडी पाहून चालक आणि शेजारी बसलेल्या व्यक्तीने गाडीच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 'सर सलामत तो गाडी पचास' म्हणत चालक आणि शेजारी बसलेल्या व्यक्तीने गाडीबाहेर उड्या मारल्या.
मुंबईत पावसाचं धुमशान
पावसाने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना सोमवारी त्रास सहन करावा लागला. सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये जाणाऱ्या नोकरदार वर्गालाही लोकलसेवा धीम्या गतीने सुरू असल्याने लेट मार्क लागला. दुसरीकडे शाळेत जाणाऱ्या आणि शाळेतून सुटणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसेस पाण्यात अडकल्याच्या घटना समोर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी होत होती. अखेर मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पनवेल आदी महानगर पालिकांनी १९ ऑगस्टला शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
