कराड नगरपालिकेत 25 वर्षानंतर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी खुलं झालं असताना याठिकाणी भाजप आणि काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे आम्हा मराठ्यांवर हा अन्याय झाला आहे, अशी भूमिका घेत नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार ॲड. श्रीकांत घोडके यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे. 'मला मतदान करू नका' असा प्रचार ते करत आहेत. शिवाय ते मतदारांच्या गाठीभेटी देखील घेत आहेत.
advertisement
या सगळ्याबाबत त्यांची भूमिका विचारली असता घोडके म्हणाले की, यामागे माझी अशी भूमिका आहे की, इथं जे लोक प्रतिनिधी आहेत. त्यांनी लोकशाहीची थटा केलीय. कराडमध्ये २० वर्षानंतर ही जागा खुला वर्ग पुरुषांसाठी सोडण्यात आली. भाजप आणि काँग्रेस दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यांचे इथे जिल्हाध्यक्ष आहेत. पण त्यांना खुल्या प्रवर्गातील उमेदवार देता आला नाही. दोन्ही पक्षांनी ओबीसी उमेदवार देऊन आम्हा मराठा समाजावर अन्यायच केला आहे.
"वार्डात देखील आरक्षणाप्रमाणे उमेदवार दिले नाही. बार, वाईन शॉप, जुगार, मटका व्यवसाय चालवणारे प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे सामान्य मतदारांमध्ये प्रचंड राग आहे. मी कुणाला जाहीर पाठींबा दिला नाही. देणारही नाही. आज माझी सामाजिक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून चळवळी उभ्या करून कोणतीही अपेक्षा न बाळगता मी लोकांचं काम केलं आहे. मी वकील आहे. धडाडीचा कार्यकर्ता आहे. लोकांनी त्यांचं मत चांगल्या विचाराला द्यायला पाहिजे. पण हे होत नाही. त्यामुळे माझा या सगळ्या गोष्टीतून विश्वास उठला आहे. त्यामुळे मी सरळ सरळ म्हणतो, मला मतदान करू नका", अशा शब्दात घोडके यांनी आपली भूमिका मांडली आहे.
