KDMC Election : कल्याण डोंबिवली महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना आज शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामु्ळे आता मतदार याद्या तयार करणे आणि प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम लवकरच निश्चित केला जाईल,अशी माहिती महापालिकेचे आयुक्त रमेश मिसाळ यांनी दिली आहे.
अंतिम प्रभाग रचना केडीएमसीच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय, नागरिकांच्या माहितीसाठी ही रचना नकाशे स्वरूपात महापालिकेच्या मुख्यालयात, सर्व विभागीय कार्यालयांमध्ये आणि 10 प्रभाग कार्यालयांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
advertisement
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर अखेर अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे.22 ऑगस्ट रोजी ड्राफ्ट प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांकडून तब्बल 264 हरकती दाखल झाल्या होत्या. यामध्ये 214 हरकती प्रभाग हद्द व वार्ड संदर्भातील होत्या. 11 सप्टेंबर रोजी या हरकतींवर सुनावणी पार पडली आणि त्यानंतरचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. राज्य निवडणूक आयोगाने या अहवालानुसार अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतर आज ही रचना केडीएमसीमध्ये प्रसिद्ध केली आहे.
प्राप्त हरकतींपैकी किती मान्य ?
एकूण 264 हरकती सूचनांपैकी 214 हरकती या प्रभागाच्या हद्दी संदर्भातील होत्या. यापैकी 4 हरकती अंशतः मान्य करण्यात आल्या आहेत. 4 हरकती व्याप्ती संदर्भातील होत्या, ज्या पूर्णतः मान्य करण्यात आल्या आहेत. उर्वरित 46 हरकती प्रभाग रचनेशी संबंधित नव्हत्या.
महापालिका उपायुक्त रमेश मिसाळ यांनी माहिती दिली की, लवकरच अंतिम प्रभाग रचनेच्या याद्या व सूचना केडीएमसीच्या अधिकृत वेबसाईटवर टाकण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांना त्यांची प्रभाग रचना, हद्द आणि आरक्षणाची माहिती उपलब्ध होणार आहे.आता प्रभाग रचना अंतिम झाल्याने निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, आरक्षणाची सोडत जाहीर होताच राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.