चंद्रपूर: एका सावकाराने कर्जाच्या वसुलीसाठी एका शेतकऱ्याला किडनी विकायला भाग पाडल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी आता एका डॉक्टराला सोलापुरातून अटक केली आहे. हा डॉक्टर लोकांना हेरून किडनी विकण्यासाठी कंबोडियाला घेऊन जात होता. या डॉक्टराने आणखी १० ते १२ लोकांची किडनी विकल्याची माहिती आता उजेडात आली आहे.
advertisement
चंद्रपूर जिल्ह्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून रोशन कुडे या शेतकऱ्याने आपली किडनी विकल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं. किडनी विकल्याच्या या प्रकरणात आता डॉक्टर कृष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू (36) याला सोलापुरातून अटक करण्यात आली आहे. किडनी विक्री प्रकरणात पीडित शेतकरी रोशन कुडे याने फेसबुकच्या माध्यमातून किडनी विकण्यासाठी माहिती मिळवली होती. त्यानंतर चेन्नई येथील डॉक्टर कृष्णा याने त्याला कंबोडिया येथे पाठवून किडनी काढल्याची तक्रार दिली होती.
डॉक्टरच निघाला एजंट
त्यानुसार पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने डॉक्टर कृष्णा याचा शोध घेतला. पोलिसांच्या तपासात डॉक्टर कृष्णा हे त्याचं बनावट नाव असून रामकृष्ण सुंचू हे त्याचं मूळ नाव आहे. रामकृष्ण हा किडनी विक्री प्रकरणात एजंट असल्याची माहिती पुढे आली होती. मुख्य म्हणजे रामकृष्ण सुंचू याला व्यवसायात तोटा आल्याने त्याने कंबोडिया येथे जाऊन स्वतःची किडनी विकली होती.
एका किडनीसाठी १ लाख रुपये कमिशन
त्यानंतर कंबोडिया येथील एका डॉक्टरने अशा प्रकारचे किडनी विकणारे लोकं पाठवल्यास 1 लाख रुपये कमिशन देण्याचं त्याला आमिष दिलं. डॉक्टरच्या सांगण्यानुसार भारतातल्या अशा गरजू लोकांना हेरून तो किडनी विकण्यासाठी त्यांना कंबोडियाला पाठवायचा. आरोपीच्या तपासात आतापर्यंत त्याने 10 ते 12 लोकांना अशा प्रकारे कंबोडिया ला पाठवल्याची माहिती समोर आली आहे. रामकृष्ण सुंचू याच्या अटकेनं आता या प्रकरणातील अवयव तस्करीच्या मोठ्या प्रकरणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
