या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह ६ जिल्ह्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. गेल्या ४२ वर्षांपासून कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच व्हावे यासाठी लढा सुरू होता. अखेर याला यश मिळाल्याने कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या सहा जिल्ह्यातील जवळपास ७० हजार प्रकरणे आता खंडपीठामध्ये चालवली जाणार आहेत.
advertisement
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच छत्रपती शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खास नात्यावर गुंफलेला तसेच कोल्हापूर खंडपीठासाठी सुरू असलेला संघर्ष ते सरन्यायाधीशांच्या हस्ते होत असलेले उद्घाटन अशा प्रसंगांवर आधारित शाहीर आझाद नाईकवाडी यांनी गायलेला पोवाडा ऐकून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या डोळ्यात पाणी आले.
अन् सरन्यायाधीशांच्या डोळ्यात पाणी आले...
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना बहुजन जनतेविषयी असणारी कणव, प्रेमाची भावना आणि शिक्षणाविषयी त्यांची तळमळ तसेच पुढे जाऊन शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केलेली शिक्षणासाठीची मदत अशा अनेक प्रसंगांना एकत्रित गुंफणारा पोवाडा आणि शेवटी बाबासाहेबांना आदर्श मानणारे सरन्यायाधीश यांच्याबद्दलचे गौरवोद्गार ऐकून भूषण गवई यांच्या डोळ्यात पाणी आले.
पोवाडा काय होता?
शाहू छत्रपतींची शिकवण, बाबासाहेबांनी ठेवली जाण, कायदे करून केले वंदन, छत्रपती राजारामानी, शाहू पुत्राने निर्णय घेऊनी, सामान्य जनतेला न्याय मिळण्यास, उच्च न्यायालय स्थापून खास, डॉ. आंबेडकर वकिल त्यासमयास, वकिली केली कोल्हापुरास... घटनेचे आद्य शिल्पकार भीमराव आंबेडकर, ज्ञानवंत थोर... पूज्य फुले कबीर गुरू मानणार, भारताची राज्य घटना लिहिणार बाबासाहेबांना मुजरा त्रिवार.... उच्च न्यायालय मुंबईत, राजधानीत...घ्यावं ध्यानात... सर्किट बेंच आलं कोल्हापुरात... करवीरकरांचा आनंद गगनात, हायकोर्ट कामाची झाली सुरुवात... सरन्यायाधीश भारताचे... पुत्र राज्याचे महाराष्ट्राचे, न्यायमुर्ती गवई आमचा अभिमान... शाहीर आझाद गातो गुणगान... हा पोवाडा ऐकून सरन्यायाधीश गवई यांचे डोळे अश्रूंनी डबडबले.
वकील आणि पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचणार
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील पक्षकार वकिलांचा संघर्ष अखेर संपुष्टात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ कोल्हापुरात आल्याने आता पक्षकार आणि वकिलांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचणार आहे.