कोल्हापूर : कोल्हापूर हे एक ऐतिहासिक शहराबरोबरच एक आध्यात्मिक शहरही आहे. अनेक आध्यात्मिक घटना या करवीर नगरीमध्ये घडल्या असल्याचे सांगितले जाते. अनेक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या मंदिरांप्रमाणेच कोल्हापुरातील श्री सिद्ध बटुकेश्वर मंदिरालाही विशेष महत्त्व आहे. कोल्हापूरच्या 4 दिशांना असणाऱ्या चार रक्षक देवतांपैकी एक देवस्थान म्हणून या मंदिराची ओळख आहे.
advertisement
कोल्हापूर अर्थात करवीर नगरीची पौराणिक महती सांगणाऱ्या श्री करवीर महात्म्य ग्रंथामध्ये कोल्हापुरातील या सिद्ध बैठकेश्वर मंदिराचे महात्म्य सांगितले आहे. दक्षिणकाशी अर्थात पंचगंगातीरी, श्री अंबाबाई देवीच्या चरणी विसावलेल सुखी आणि समृद्ध ठिकाण म्हणजे करवीर नगरी आहे. या नगरीच्या रक्षणाकरिता श्री महालक्ष्मीने चारी दिशांना वेगवेगळ्या देवतांची नियुक्ती केली होती. पूर्व दिशेला उज्ज्वलांबादेवी (उजळाई देवी), पश्चिमेला श्री सिद्ध बटुकेश्वर, उत्तरेला श्री ज्योतिलींग आणि दक्षिणेस श्री कात्यायनी देवी अशा या देवता आहेत. त्यापैकीच एक हे सध्याच्या शिंगणापूर जवळील चंबुखडी येथील श्री सिद्ध बैठकेश्वराचे मंदिर आहे, अशी माहिती मंदिराचे पुजारी अतुल अशोक प्रभावळीकर यांनी दिली आहे.
काय आहे मंदिराचे महात्म्य?
करवीरच्या पश्चिम द्वाराचे रक्षणासाठी कोल्हासूर राक्षसाने सध्याच्या चंबूखडी टेकडीवर रक्ताक्ष नावाच्या राक्षसाची नियुक्ती केली होती. कोल्हासुराच्या वधानंतर करवीर निवासिनी श्री अंबाबाईने करवीरच्या रक्षणासाठी या पश्चिम द्वारावरील रक्ताक्ष राक्षसाचा वध करण्यासाठी श्री सिद्ध अर्थात गणपती आणि श्री बटुकेश्वर अर्थात भैरव या दोन देवतांना नियुक्त केले होते. प्रथम बटुकेश्वर प्रथम रक्ताक्षावर चालून गेले असता युद्धावेळी रक्ताक्षाने श्री बटुकेश भैरवास मायास्त्राने मोहित केले. हे पाहुन श्री सिद्ध गणेश रक्ताक्षावर चालून गेले आणि त्यांनी रक्ताक्षाचे शिर धडावेगळे केले. पुढे श्री सिद्ध आणि श्री बटुकेश्वर नंतर याच पर्वतावर निवास करून राहिले, अशी महती करवीर महात्म्य ग्रंथातील 48 व्या अध्यायात सांगितल्याचे पुजारी प्रभावळीकर यांनी सांगितले.
अंगारकी चतुर्थी निमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, पाहा VIDEO
कसे आहे मंदिर आणि परिसर -
या मंदिराच्या ठिकाणी सिद्ध बटुकेश्वराचे अगदी छोटेसे मंदिर या टेकडीवर पूर्वी होते. काळानुरूप बदल होत नंतर या मंदिराचा आणि आसपासच्या परिसराचा विकास करण्यात आला. सध्या पुढे एक छोटा हॉल आणि आतमध्ये सिद्ध बटुकेश्वराचे छोटे मंदिर पाहायला मिळते. समोरच्या बाजूला मध्ये श्री सिद्ध आणि त्याच्या शेजारी श्री बटुकेश्वराची मूर्ती पाहायला मिळते.
तर गाभाऱ्याच्या मधोमध भैरव म्हणजेच श्री बटुकेश्वर लिंगरूपात या ठिकाणी आभाराच्या मधोमध आहेत. टेकडी चढताना मध्यावर एक छोटे तीर्थदेखील आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीस या सिद्ध छोट्या तळ्यामध्ये स्नान करून जो या गणेशाची पूजा करतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते, असे देखील प्रभावळीकर पुजारी सांगतात.
कशी होत असते पूजाअर्चा -
पुजारी अतुल अशोक प्रभावळीकर हे गेली 30 वर्षे या मंदिराचे पुजारी म्हणून पूजाअर्चा करत आले आहेत. मंदिरात दररोज सकाळी 7.30 ते 8.30 वाजेपर्यंत पंचोपचार पूजा केली जाते. मंगळवारी, शुक्रवारी भाविक अभिषेक पूजा करण्यासाठी येत असतात. संकष्टीच्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता अभिषेक केला जातो. तर रात्री चंद्रोदयावेळी आरती केली जाते. अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने पहाटे आणि चंद्रोदयावेळी देखील अभिषेक पूजा केली जाते. तर गणपतीचे आवडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवून रात्री आरती प्रभावाळीकर पुजारी करत असतात.
सध्या एक महत्त्वाचे देवस्थान त्याचबरोबर एक छोटेसे पर्यटन स्थळ म्हणूनही हे मंदिर प्रसिद्ध आहे. एक रम्य, विलोभनीय निसर्गदर्शन घडवणारे असे हे ठिकाण असून नेहमीच या ठिकाणी अल्हाददायक वातावरण असते. टेकडीवरून भव्य-दिव्य कोल्हापूर शहराचे दर्शन करता येत असल्यामुळे देखील बरेच जण या ठिकाणी येतात. तर आजकाल संकष्टी दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक श्रद्धापूर्वक श्री सिद्ध बटुकेश्वरास येत असतात.
सूचना - ही माहिती संबंधित पुजाऱ्यांशी साधलेल्या संवादानंतर लिहिली गेली आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.