परशराम पांडुरंग पाटील असं अटक केलेल्या ४४ वर्षीय पतीचं नाव आहे. तर अस्मिता परशराम पाटील असं हत्या झालेल्या ४२ वर्षीय पत्नीचं नाव आहे. कर्जाच्या पैशांवरून झालेल्या वादानंतर ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबतची कबुली आरोपीनं स्वत: पोलिसांकडे दिली आहे. करवीर पोलिसांनी त्याला अटक केली असून ही घटना बुधवारी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास घडली.
advertisement
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अस्मिता पाटील शिवणकाम करत होत्या, तर त्यांचे पती परशराम हे उद्यमनगरात एका फाउंड्रीमध्ये कामाला होते. मंगळवारी रात्री जेवण झाल्यावर पती-पत्नीमध्ये पैशांवरून वाद सुरू झाला. परशराम यांनी अस्मिता यांना विचारले, "लाखो रुपयांचे कर्ज आणि व्याजाने घेतलेले पैसे तू कुठे खर्च करतेस?" यावरून वाद वाढत गेला. रागाच्या भरात परशरामने पत्नीचा गळा दाबला. मात्र, ती पूर्णपणे मृत झाली नाही असे वाटल्याने त्याने चाकूने तिचा गळा चिरला. या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अस्मिता यांना पाहून काही वेळाने मुलं आलोक आणि पार्थ घरी आले. त्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण आतून कडी लावलेली होती.
काही वेळाने परशराम पाटील यांनी स्वतः पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी दरवाजा उघडला आणि पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कर्जापायी विकले होते घर
अस्मिता पाटील यांनी काही वर्षांपूर्वी सुमारे २० लाखांचे कर्ज घेतले होते, जे फेडण्यासाठी परशराम यांना कळंबा येथील स्वतःचे घर विकावे लागले. त्यानंतर पाटील कुटुंब गेल्या ५ वर्षांपासून महालक्ष्मीनगरात भाड्याच्या घरात राहत होते. भाड्याचा खर्च परवडत नसल्यामुळे अस्मिता यांनी आपले शिवणकामाचे दुकानही बंद केले होते.
काही महिन्यांपूर्वी, अस्मिता यांनी पुन्हा मुले आलोक (२२) आणि पार्थ (२०) यांच्या नावावर प्रत्येकी एक लाखाचे कर्ज एका फायनान्स कंपनीकडून घेतले होते. मात्र, ही गोष्ट त्यांनी पती परशराम यांना सांगितली नव्हती आणि मुलांनाही वडिलांना याबद्दल काही न सांगण्याची ताकीद दिली होती.
जेव्हा परशराम यांना या कर्जाबद्दल समजले, तेव्हा त्यांना खूप राग आला. आधीच कर्जापायी घर विकण्याची वेळ आल्यामुळे संतापलेल्या परशरामने अस्मिता यांना जाब विचारला. "तू वारंवार कर्ज का काढतेस आणि हे पैसे कोणाला देतेस?" असे त्यांनी विचारले, पण अस्मिता यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. या सततच्या वादामुळे परशराम यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.