मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील राजेबागस्वार इथं भारत तरुण मंडळ नावाचं मंडळ आहे. या मंडळाचा राजेबागस्वार फुटबॉल क्लब देखील आहे. शुक्रवारी या क्लबचा ३१ वा वर्धापनदिन होता. या मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त एका समाजाने सिद्धार्थनगरच्या कमानीजवळ मोठा साऊंड आणि बॅनर लावले होते. रस्त्यावरच बॅनर आणि साऊंड लावल्याने तिथून ये-जा करणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होऊ लागला. यामुळे तेथील काही स्थानिकांनी मंडळाकडे तक्रार करून संबंधित बॅनर आणि साऊंड सिस्टम हटवण्याची विनंती केली.
advertisement
पण यावरून दोन गटात वादाची ठिणगी पडली आणि बाचाबाची झाली. यानंतर हा वाद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी सूचना केल्यानंतर संबंधित बॅनर आणि साऊंड सिस्टम हटवायला लावली. पण शुक्रवारी दुपारी झालेल्या वादाचे पडसाद रात्री उमटले. याच वादातून दोन समाज आमने सामने आले आणि दंगल घडली.
रात्री 60 मिनिटांत काय घडलं?
दुपारी झालेल्या वादाचा राग मनात धरून एका समाजाच्या गटाने रात्री उशिरा एकत्र येत अचानक दुसऱ्या गटाच्या परिसरात शिरकाव केला. तयारीनिशी आत घुसलेल्या समाजकंठकांनी अचानक दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड सुरू केली. त्यांनी काही गाड्या फोडून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन पेट्रोल बॉम्ह टाकल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे हा सुनियोजित हल्ला होता का? अशी चर्चा सुरू आहे. अशाप्रकारे अचानक हल्ला झाल्याचं पाहून दुसऱ्या गटातील लोकही सावध झाले. त्यांनीही आक्रमक पवित्रा घेत, प्रतिहल्ला केला. दोन्ही बाजुने दगडफेक करण्यात आली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. पण जमावामध्ये मोठ्या प्रमाणात महिला देखील होती. घटनेच्या वेळी पोलीस पथकाकडे फारसे महिला पोलीस कर्मचारी नव्हते. यामुळे गर्दीला पांगवणं पोलिसांसाठी आव्हानात्मक होतं. पण पोलिसांनी अधिक कुमक मागवून दोन्ही गटाला पांगवलं आणि परिसरात शांतता निर्माण केली. हा सगळा प्रकार शुक्रवारी रात्री साधारण १० ते ११ वाजण्याच्या सुमारास घडला.
पण यानंतर परिसरात रात्रभर तणावाचं वातावरण होतं. पण दंगल आणखी वाढू नये म्हणून खबरदारी घेत पोलीसांनी फौजफाटा वाढवला. शनिवारी सकाळपर्यंत या परिसरात तणावपूर्ण शांतता होती. आता पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल व्हिडीओजच्या माध्यमातून हल्लेखोरांची ओळख पटवत आहेत. सध्या कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.