वारसा जपणारी कोल्हापुरी चपलांची ओळख
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील उद्योजक महेश पोवार यांनी या स्टॉलद्वारे कोल्हापुरी चपलांची समृद्ध परंपरा सादर केली. 500 रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंत किमतीच्या विविध डिझाइनच्या चपलांना मोठी मागणी होती. विदेशी पाहुण्यांनी कोल्हापुरी चपलांची रचना, टिकाऊपणा आणि हाताने तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेतली. अनेकांनी आपल्या कुटुंबीयांसाठी मापानुसार चपला तयार करून घेण्याची इच्छा व्यक्त केली.
advertisement
या परिषदेदरम्यान लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विविध राष्ट्रांतील संसदाध्यक्ष आणि सभापतींनी या स्टॉलला भेट देत पोवार यांच्याशी संवाद साधला. त्यांनी कोल्हापुरी पादत्राणांच्या इतिहासासह पारंपरिक कारागिरीबाबत माहिती दिली.
पिढ्यान्पिढ्या चालत आलेला 'शैलेश फूटवेअर'चा वारसा
शैलेश फूटवेअर या व्यवसायाला सुमारे 70 वर्षांची कौटुंबिक परंपरा असून कोल्हापूरच्या राजघराण्यापासून अनेक नामवंत राजकीय नेते येथे पादत्राणे खरेदी करतात. औंध संस्थानाच्या हत्तीसाठी खास तयार करण्यात आलेल्या कोल्हापुरी चपलांमुळेही हा ब्रँड चर्चेत आला होता.
या प्रदर्शनासाठी आणलेल्या सुमारे 500 जोड चपलांपैकी बहुतेक विकल्या गेल्याचे पोवार यांनी सांगितले. याआधी दिल्ली, आग्रा, बेंगळुरू येथेही त्यांनी यशस्वी सहभाग घेतला असून सूरजकुंड (हरियाणा) येथील प्रदर्शनासाठीही त्यांना आमंत्रण मिळाले आहे.
'प्राडा मेड इन इंडिया'साठी महेश पोवार यांची निवड
दरम्यान इटलीतील नामांकित प्राडा कंपनीने कोल्हापुरी चपलांपासून प्रेरणा घेत त्या जागतिक स्तरावर सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.प्राडा मेड इन इंडिया या उपक्रमासाठी निवड झालेल्या कारागिरांमध्ये महेश पोवार यांचा समावेश आहे.
