कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कित्येक ठिकाणी बंधाऱ्यावर पाणी आले आहे. त्यातच कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पाणी आल्याने हा महामार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सर्फदारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या नागरिकांना थोडी कसरत करावी लागणार आहे.
कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत चालल्याने नदीने अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. शेतकऱ्यांमध्ये पाणी शिरल्या असून कित्येक एकर पिकांचे नुकसान होत आहे. पुराचा फटका बसणाऱ्या नदीकाठच्या गावांमध्ये नागरिकांचे स्थलांतराची तयारी सुरू आहे. त्यातच कोल्हापूर ते रत्नागिरी या महामार्गावर केरली या गावांची रस्त्यावर साधारण दीड फूट पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून बॅरिकेट्स लावून येणाऱ्या वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
advertisement
पाणी आलेल्या रस्त्यावर वाहतूक करू नये -
23 जुलै सकाळी 8 वाजता पोलिसांचा बंदोबस्त सुरू झाला तेव्हा केर्ली मार्गे कोल्हापूर ते रत्नागिरी या महामार्गावर जास्त काही पाणी नव्हते. मात्र, जसजशी पंचगंगा नदीची पातळी प्रत्येक इंचाने वाढू लागली आहे, तसतशी या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली. नंतर ही वाहतूक सध्या पूर्ण बंद करण्यात आली आहे. सध्या रस्त्यावर दीड फुटापर्यंत पाणी असून पाण्याला प्रचंड वेग आहे. त्यामुळे कोणत्याही वाहनधारकाला जाण्यास मनाई केली जात आहे.
या महामार्गाऐवजी वाहनधारकांना वाघबीळ आणि बोरपाडळे अशा पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. रस्त्यावर दिसणारे पाणी हे साधारण फक्त दीड फूट असले तरी पाण्याला वेग जास्त असून पाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे नागरिकांनी अघोरी धाडस करू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी केले आहे.
धरणांमधून पाण्याचा विसर्ग -
पंचगंगेची जरी पाणी पातळी वाढत असली तरी नागरिकांचे लक्ष राधानगरी धरणाकडेही लागले आहे. सध्या राधानगरी धरण हे 90 टक्के भरले आहे. जलविद्युत केंद्रातून 1500 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील चांदोली धरणाचे दोन दरवाजे उघडले. 23 जुलै दुपारी 12 वाजता वारणा धरणाचे 2 वक्र दरवाजे 1 मीटरने उचलण्यात आले आहेत. यातून 2200 क्युसेक आणि विद्युत जनित्रातून 1600 क्युसेक असे एकुण 3800 क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरून लवकरच धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होऊ शकतात. त्यानंतर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अजूनच वाढ होऊ शकते. या कारणाने जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.