सोहळ्याच्या सुरुवातीला पारंपरिक मंत्रोच्चाराने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी पोवाड्यांच्या माध्यमातून शिवरायांचे शौर्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेच्या गाथा सादर करण्यात आल्या. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नवीन राजवाड्याच्या दरबारात आयोजित हा सोहळा कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक ठरला. कोल्हापुरात नवीन राजवाड्याच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या सोहळ्याला विशेष महत्व आणि परंपरा आहे. छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी एडवोकेट राजेंद्र चव्हाण यांनी या परंपरेचे महत्त्व सांगितले.
advertisement
"शिवराज्याभिषेक सोहळा हा स्वराज्याच्या मूल्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अमूल्य ठेवा आहे. हा सोहळा प्रत्येक मराठी माणसाला स्वाभिमान, एकता आणि कर्तृत्वाची प्रेरणा देतो," असे चव्हाण म्हणाले. ट्रस्टतर्फे दरवर्षी हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.
दरम्यान, या सोहळ्यास कोल्हापूरसह परिसरातील गावांमधून हजारो शिवभक्त उपस्थित होते. ढोल-ताशांचा निनाद, पारंपरिक वेशभूषा आणि शिवरायांच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले. शाहू महाराजांनी उपस्थितांना स्वराज्याचे तत्त्व अंगीकारण्याचे आणि शिवरायांचा आदर्श पुढे नेण्याचे आवाहन केले. हा सोहळा कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा अभिमानास्पद क्षण ठरला.