कोल्हापूर : देशभरासह कोल्हापुरातही मोठ्या जल्लोषात बाप्पांचे आगमन झाले आहे. यात ढोल ताशे आणि डीजेच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसली. मात्र, गेल्या काही वर्षापासून लेझर शोचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे पाहायला मिळत आहे. यात हा लेझर शो अनेकांच्या जीवावरही बेतला आहे. यामुळे अनेकांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम झाले आहे.
या लेझर लाइट्स लावल्याने फक्त मिरवणुकीत सहभागी असलेलेच नव्हे तर मिरवणूक बघायला येणाऱ्याच्या डोळ्यांनाही गंभीर दुखापत होताना दिसून येत आहे. या लेझरचा तुमच्या नजरेवर नेमका कसा परिणाम होतो? त्याची कारणे नेमकी काय आहेत आणि त्यावर कोणत्या उपाययोजना आहेत, या संदर्भात लोकल18 च्या टीमने नेत्ररोग तज्ञ डॉ. गायत्री होशिंग यांच्याशी संवाद साधला.
advertisement
डॉ. होशींग या नेत्ररोग तज्ञ असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून लेझर शोमुळे डोळ्यांना दुखापत झालेल्या अनेक रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की, तीव्र स्वरूपाच्या लेझर लाइटचा निश्चितच डोळ्यावर परिणाम होतो. कारण लेझर लाइट हा टार्गेटेड असतो. डोळ्यांमधील रेटिनाच्या मध्यावर हा लाइट पडला तर डोळा भाजतो. तेथे काळे डाग पडतात. नजर अंधुक होते किंवा दृष्टी जाते. तीव्र प्रकाशझोतामुळे रेटिनाच्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या रक्तवाहिन्या फुटतात. तसेच काही वर्षांपासून गणेशोत्सव काळात कोल्हापूर जिल्ह्यात 'लेझर शो'मुळे 70 हून अधिक जणांच्या डोळ्यांना इजा झाल्याची नोंद होती.
गेल्या वर्षीही असे प्रकार समोर आले होते. त्यामुळे लेझर आणि कर्णकर्कश अशा डीजेचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाईची गरज आहे. तसेच ही कारवाई केवळ कागदावरची कारवाई नको. कुठल्याही मिरवणुकीत जीवनात अंधार आणि बहिरेपणा आणणारे हे घातक प्रकार थांबवणे आवश्यक आहे, असे डॉ. गायत्री होशिंग यांनी सांगितले.
Ganeshotsav Pune : तुळशीबाग मंडळाचा उपक्रम, यंदाच्या वर्षी तयार केला जगन्नाथ पुरीचा देखावा, VIDEO
"लेझर शो"चा ट्रेण्ड; मंडळांमध्ये स्पर्धा -
खरे तर डोळा हा आपल्या शरीरातला सर्वांत नाजूक अवयव आहे. त्यामुळे तो इतका संवेदनशील असतो की, त्यात अत्यंत बारीक धूळ जरी गेली तरी त्याचा त्रास होतो. लेझर शोच फॅड तरुणाईत उत्सवाच्या दिवशी लावणे, हा ट्रेंड सध्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेक मंडळांमध्ये लेझर शो कोणाचा चांगला यावरून स्पर्धा सुरू असते. त्यामुळे अनेक मोठमोठे लेझर शो मंडळांकडून लाखो रुपये खर्चून केले जात आहेत. पण याचा फटका मिरवणुकीत सामील असणाऱ्यांनाच नव्हे तर मिरवणूक बघण्यासाठी आलेल्या नागरिकांना बसत आहे.