2008 मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्ररचनेनंतर सलगपणे एकनाथ शिंदे कोपरी-पांचपाखाडीतून आमदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांना चांगलं मताधिक्य मिळत आहे.
त्यापूर्वी ठाणे मतदारसंघातून एकनाथ शिंदे विजयी झालेले होते. तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंड करत महाविकास आघाडी सरकारमधून काही शिवसेना आमदार बाहेर पडले. नंतर भाजपच्या पाठिंब्याने महायुती सरकार बनवलं. त्यामध्ये ठाण्यातले सगळे आमदार शिंदेच्या पाठिशी राहिले. पण खासदार राजन विचारे मात्र उद्धव ठाकरेंच्या बरोबर राहिले.
advertisement
शिवसेना कुणाची याचे वाद सुरू असतानाच अजित पवारही शरद पवारांपासून वेगळे होत महायुतीत सामील झाले. आता महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून अनेक वेळा पक्षफुटी, बंडखोरी आणि सरकारं गडगडताना राज्याने पाहिली असली तरी दोन मोठे पक्ष फुटून इतर दोन राष्ट्रीय पक्षांबरोबर सारख्याच ताकदीने उभे राहिलेले पहिल्यांदाच महाराष्ट्र पाहतो आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची ताकद भाजप आणि काँग्रेसला विभागून दिली आहे. आता यात कोण तुल्यबळ ठरतो हे मतदारांच्या हाती आहे. आताच्या राजकीय स्थितीनुसार येथला मतदारवर्गही विभागला आहे.
मविआ आणि महायुतीसाठी ठाणे ही प्रतिष्ठेची जागा आहे. ठाण्यातील मतदारसंघांमध्ये सध्या कागदावर तरी शिंदे गटाचं प्रभुत्व दिसत आहे.
गेल्या दोन निवडणुकांमध्ये किती मतं?
2014 मध्ये युती म्हणून निवडणूक लढली नव्हती त्यावेळी एकनाथ शिंदे यांना एक लाख मते मिळाली होती. तर, भाजपाचे संदीप लेले आणि काँग्रेसचे मोहन तिवारी यांचा मोठ्या फरकाने त्यांना पराभव केला होता. 2019 मध्ये अखंड शिवसेना आणि भाजप यांची युती होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना 1,13,000 मतं मिळाली होती. काँग्रेस आणि मनसेच्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता.
2024 लोकसभा निवडणुकीला काय झालं?
ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी एक कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघ आहे. सहापैकी मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार सोडल्यास बाकी सगळ्या विधानसभांचे आमदार महायुतीत आहेत. तीन भाजप आणि उर्वरित दोन शिवसेनेचे आमदार आहेत.
ठाण्यात प्रथमच दोन सेनांविरुद्धचा सामना लोकसभा निवडणुकीच्या वेळी रंगला. माजी खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरेंचं समर्थक विरुद्ध एकनाथ शिंदेंचे समर्थक शिवसेना नेते नरेश म्हस्के यांच्यात थेट लढत झाली. नरेश म्हस्के खासदार म्हणून निवडून आले आणि एकनाथ शिंदेंची ठाण्यातली ताकद लक्षात आली. नरेश म्हस्के यांना कोपरी पांचपाखाडी क्षेत्रातून 44338 मताधिक्य मिळालं. त्यामुळे अर्थातच ठाण्याबाबतचा शिवसेनेचा आणि महायुतीचा विश्वास वाढलेला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सगळ्या विधानसभा क्षेत्रांतून नरेश म्हस्के यांना मताधिक्य मिळालं. सर्वाधिक मताधिक्य ओवळा माजिवडा या प्रताप सरनाईकांच्या मतदारसंघातून मिळालं होतं.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील 2019 चं चित्र
मिरा भाईंदर - गीता जैन (अपक्ष)
ओवळा माजिवडा - प्रताप सरनाईक (शिवसेना शिंदे गट)
कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे (शिवसेना शिंदे)
ठाणे - संजय केळकर (भाजप)
ऐरोली - गणेश नाईक (भाजप)
बेलापूर - मंदा म्हात्रे (भाजप)
ठाणे जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघ
ठाणे जिल्ह्यात18 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी 6 ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग आहेत.
भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे (शिवसेना)
शहापूर - दौलत दरोडा (राष्ट्रवादी)
भिवंडी पश्चिम - महेश प्रभाकर चौगुले (भाजप)
भिवंडी पूर्व - रईस शेख (समाजवादी पार्टी)
कल्याण ग्रामीण - प्रमोद (राजू) पाटील (मनसे)
मुरबाड - किसन कथोरे (भाजप)
अंबरनाथ - बालाजी किणीकर (शिवसेना)
उल्हासनगर - कुमार आयलानी (भाजप)
कल्याण पूर्व - गणपत गायकवाड (भाजप)
डोंबिवली - रवींद्र चव्हाण (भाजप)
कल्याण पश्चिम -विश्वनाथ भोईर (शिवसेना)
मुंब्रा-कळवा -जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार)
