उद्यापासून जरांगेंची शांतता रॅली: मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारला एका महिन्याचा अवधी दिला आहे. सराकारने कार्यवाहीच्या दिलेल्या आश्वासनानंतर जरांगेंनी उपोषण जरी मागे घेतले असले तरी जरांगे सातत्याने समाजाच्या संपर्कात आहेत. जरांगे मराठा बांधवांची वज्रमुठ सैल पडू नये, यासाठी प्रयत्नशील आहेत. उद्यापासून मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून जरांगे शांतता रॅली काढणार आहेत. यामध्ये मराठा बांधवांनी मोठ्या संख्येन सहभागी व्हावं असं आवाहन जरांगेंनी केलं आहे.
advertisement
कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे. हैद्राबाद गॅझेट, सातारा गॅझेट विचारात घेत सगेसोयरे आरक्षणाच्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी जरांगेंची प्रमुख मागणी आहे.
लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप: आता मनोज जरांगेंनी आय़ोजित केलेल्या शांतता रॅलीवर 'ओबीसी आरक्षण बचाव'चे नेते लक्ष्मण हाकेंनी चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. " एकीकडे ओबीसी आंदोलकांच्या रॅलीवर दगडफेक करायला लावायची; आणि दुसरीकडे शांतता रॅली काढायची " असा गंभीर आरोप हाकेंनी जरांगेंवर केला आहे. " जरांगेंनी जातीपातीत फूट पाडण्याचे धंदे बंद करावेत, एकवटलेल्या ओबीसीमधील धनगर समाजाला एसटी आरक्षणाची गाजरं दाखवू नयेत " असंही हाके म्हणाले.
जरांगेंची मागणी घटनाबाह्य -हाके " जरांगेंनी कितीही दबाव आणला तरी सरकार सगेसोयरे आरक्षणाच्या अंमलबजावणीचा जी आर आणू शकत नाही...त्यामुळे जरांगेंची मागणीच मुळात घटनाबाह्य आहे" असं दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. पुढे बोलताना सराटे यांनी सरकारला दिलेल्या अहवालात EWS आरक्षणाचा सुचवलेला पर्यायच मराठा समाजासाठी योग्य असल्याचं हाके यांनी म्हटलं.
रविवारी संभाजीनगरमध्ये ओबीसी समाजाची बैठक: ज.रांगेंवर टीकेचे बाण सोडत येत्या रविवारी ओबीसी समाजाला छत्रपती संभाजीनगरमध्ये एकवटण्याचं आवाहन लक्ष्मण हाके यांनी केलं आहे. यावेळी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. यावेळी ओबीसी जनजागृती राज्यव्यापी दौऱ्याचं नियोजन आखलं जाणार आहे. त्यामुळे आता एकीकडे जरांगेंची शांतता रॅली तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेंची ओबीसी जनजागृती रॅली पाहायला मिळाली, तरी आश्चर्य वाटायला नको.
शांतता रॅलीवरून लक्ष्मण हाकेंनी केलेल्या गंभीर आरोपांना आता मनोज जरांगे काय उत्तर देणार, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
