लातूर महानगर पालिकेची निवडणूक भाजप नेत्याला आयुष्यभर आठवणीत राहणारी ठरणार आहे. ७० जागांच्या या महानगरपालिकेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मागील निवडणुकीत इथं भाजपनं सत्ता काबीज केली होती. यंदाही इथं भाजपसाठी सकारात्मक वातावरण झालं होतं. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या एका वक्तव्यामुळं इथली निवडणूक फिरल्याचं बोललं जातंय.
"लातूरमध्ये विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात काही शंका नाही" असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं. त्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून हे वक्तव्य केलं होतं. पण याच वक्तव्यामुळे इथली निवडणूक फिरल्याची चर्चा आहे. भाजपचे रवींद्र चव्हाण हेच काँग्रेससाठी 'स्टार प्रचारक' ठरले. चव्हाणांच्या वक्तव्यानंतर मरगळ आलेली काँग्रेस आणि त्यांचे कार्यकर्ते अंग झाडून कामाला लागले आणि इथं काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.
advertisement
खरं तर, लातूर म्हणजे विलासराव देशमुख हे गणित मागील अनेक वर्षांपासून संपूर्ण जिल्ह्यात आहे. विलासराव देशमुखांच्या निधनानंतरही त्यांच्या समर्थकांनी अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांची साथ सोडली नाही. पण विधानसभा निवडणुकीत देशमुख कुटुंबाची व्होटबँक काहीशी हलल्याचं दिसलं होतं. पण रवींद्र चव्हाणांमुळे लातूरमधील जनमत फिरल्याची चर्चा आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाणांच्या कायम आठवणीत राहिल असा हा निकाल लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसला लातूर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळालं असून काँग्रेस-वंचित आघाडीला मोठं यश मिळालं आहे.
लातूर : महानगरपालिका निवडणूक निकाल
एकूण जागा : ७०
काँग्रेस - ४३
वंचित - ०४
भाजप - २२
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार - ०१
