लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरस्थिती कायम असताना शेतकऱ्यांच्या मागे बँकांनी पीक कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्याचे चित्र आहे. राज्यातील शेतकऱ्यावर अतिवृष्टी आणि पुराचे संकट असल्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांकडील पीक कर्ज वसुली तात्काळ थांबविण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र या आदेशाचे आता खुलेआम उल्लंघन लातूर जिल्ह्यात होताना दिसून येत आहे.
advertisement
औसा तालुक्यातील वरवडा या गावच्या विशाल बलभीम करंडे या शेतकऱ्यास आयसीआयसीआय बँकेच्या औसा शाखेने न्यायालयाच्या माध्यमातून नोटीस पाठवून वसुलीचा तगादा लावला होता. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित शेतकऱ्याला घेऊन बँकेत धडक दिली होती. तसेच बँकेंच्या व्यवस्थापकास याबाबत जाब विचारला होता.
शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असून बँकांनी शेतकऱ्याने घेतलेल्या पीक कर्जाची वसुली तात्काळ थांबवावी, कुठल्याही शेतकऱ्याच्या मागे बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये.अतिवृष्टी मुळे तसेच पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पीकं वाया गेलेली आहेत. शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं असल्यामुळे शेतकरी कुठल्याही प्रकारचे कर्ज भरू शकत नाही.त्यामुळे यापुढे असे काही प्रकार घडल्यास चाबकाच्या फटकाऱ्याने फोडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.