डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते आंबेडकर पार्क या मार्गावर पायी चालत जाणारा हजारोंचा जत्था या शक्तिप्रदर्शनामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांचे डोळे आता विस्फारले आहेत. पहिल्याच रॅलीला झालेली हजारोंची गर्दी आणि त्यात मुस्लिम आणि दलित मतदारांचा मोठा सहभाग यामुळे आतापर्यंत कॉंग्रेसची वोट बँक मानल्या जाणाऱ्या दलित मुस्लिम मतदारांमध्ये बदलाचे वारे वाहू लागलेत, असे रॅलीतील कार्यकर्ते सांगत होते.
advertisement
स्थानिक आमदार अमित देशमुख सर्वच बाबतीत निष्फळ ठरल्याने दलित मुस्लिम वोट बँक वंचित सोबत असल्याचे वंचितचे उमेदवार विनोद खटके सांगतात. तर यावेळी मुस्लिम मतदार विकला जाणार नसल्याचे रॅलीतील मुस्लिम मतदार सांगत होते. दरम्यान वंचित बहुजन आघाडी यावेळी सर्वच जागा लढविणार असून यावेळी पूर्ण ताकतीने आम्ही निवडणुकीला सामोरे जावू, असे वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर यांनी सांगितले.
गेली तीन टर्म दलित आणि मुस्लिम वोट बँकेच्या एकगठ्ठा मतदानामुळे कॉंग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी कॉंग्रेसचा गड राखण्यात यश मिळवलं. मात्र हीच वोट बँक जर अमित देशमुख यांच्यापासून दूर गेली तर त्यांच्या विजयाचा मार्ग अवघड होईल, असे राजकीय जाणकार सांगतात.
काँग्रेसची उमेदवार यादी अद्यापपर्यंत नाही
महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आणि महाराष्ट्र काँग्रसने अद्याप एकही उमेदवार यादी जाहीर केलेली नाहीये. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार थेट उमेदवारी अर्ज भरत आहेत. जवळपास सर्वच विद्यमान आमदारांना पवार यांनी पुन्हा उमेदवारी दिली आहे. अशावेळी काँग्रेसकडून मात्र उमेदवारी यादी लांबण्यामागचे कारण समजू शकलेले नाही. गुरूवारी काँग्रेस पक्ष उमेदवारी यादी जाहीर करेल, अशी शक्यता आहे.
