दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील न्यू दिंडोशी रॉयल हिल्स सोसायटीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून रात्री अपरात्री बिबट्याचा वावर पाहायला मिळत आहे. बिबट्याच्या मुक्त संचाराचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
बिबट्याचे मुंबईत संभाव्य हल्ले रोखण्यासाठी आमदार सुनील प्रभू यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहिले आहे. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे गोरेगावात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षितेचे वातावरण आहे. याआधी या भागात संरक्षण जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र या जाळ्या ओलांडून बिबट्या सोसायटीमध्ये शिरत आहे. त्यामुळे बिबट्याचे संभाव्य हल्ले आणि जीवितहानी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत, असे पत्र आमदार सुनील प्रभू यांनी मंत्री गणेश नाईक यांना पाठवला आहे.
advertisement
सुनील प्रभू यांनी गणेश नाईक यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?
गोरेगाव परिसरात बिबट्याचे तसेच अन्य वन्य जीवांचा संचार होत असल्यामुळे भविष्यात होणारी जीवित हानी रोखण्यासाठी आणि वन्यजीवांचे संरक्षण होऊन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उपरोक्त सोसायटीच्या आवारात 26 मे 2023 रोजी संरक्षणासाठी म्हाडाची परवानगी घेऊन संरक्षण जाळ्या बसविण्यात आल्या होत्या, परंतू बिबटे संरक्षण जाळी ओलांडून सोसायटीच्या आवारात येत असल्याचे, येथील रहिवाश्यांच्या निदर्शनास आले आहे. तसेच शेजारील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची ६ फूट उंच जाळी ओलांडून बिबटे सोसायटी परिसरात प्रवेश करीत आहेत. यामुळे या परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन, भीतीदायक जीवन जगत असून नागरिकांना दिवसा ढवळ्या बाहेर पडणे देखील कठीण झाले आहे. तरी उपरोक्त विषयात कार्यवाही करावी, असे सुनील प्रभू यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
